बेळगाव शहरातील राजू पवार फाउंडेशनतर्फे आयोजित कॉमेडी चॅरिटेबल शो केएलईच्या शताब्दी सभागृहामध्ये नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम व भारत गणेशपुरे यांनी या कार्यक्रमात बहार उडवून देताना बेळगावकरांना खळखळून हसविले.
राजू पवार फाउंडेशनतर्फे काल रविवारी सायंकाळी शहरात कॉमेडी चॅरिटेबल शोचे आयोजन करण्यात आले होते. केएलई शताब्दी जिरगे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. राजू पवार डान्स अकॅडमीचे प्रमुख राजू पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून रसिकांचे मनोरंजन करणारे भाऊ कदम यांनी ‘बे’ चा पाढा किती विनोदी अंगाने म्हणता येतो हे दाखवून दिले.
भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे या जोडगोळीने राजकारण, समाजकारण, शिक्षण यावर विनोद सादर करून रसिकांना मनमुराद हसायला लावले. आपल्या रोजच्या जीवनात अनेक विनोद घडत असतात फक्त त्याचा आनंद आपण घेत नाही रोजच्या जगण्यातील होणारे विनोद निखळपणाने हसू शकतात हे भाऊ कदम व भारत गणेशपुरे यांनी दाखवून दिले.
सदर कार्यक्रमाच्या औचित्य साधून कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या शहरातील डॉक्टर्स व हॉस्पिटल्सचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात राजू पवार डान्स अकॅडमीतर्फे बहारदार असे एकाहून एक सरस नृत्यप्रकार सादर करण्यात आले. लावणी, देशभक्तीपर गीते, चित्रपट संगीतातील गाण्यांवर युवा नर्तकांनी केलेल्या नृत्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. विशेष करून चंद्रमुखी चित्रपटातील ‘चंद्रा’ आणि नटरंग चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यावर सादर केलेल्या लावणी नृत्याला प्रेक्षकांचा वन्समोर मिळाला.