हुबळी दक्षिण आणि कुंदगोळ दरम्यान टॉवर कार बसवण्यात येत असल्यामुळे बेळगावहून बेंगलोरकडे हुबळी मार्गे धावणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या आता होस्पेट मार्गे वळविण्यात आल्या आहेत.
या मार्ग बदलामुळे प्रवाशांची गैरसोय होणार असून बेंगलोरला पोहोचण्यास नियोजित वेळेपेक्षा 8 ते 10 तास उशीर होणार आहे.
हुबळी दक्षिण आणि कुंदगोळ दरम्यान टॉवर बसवण्यात येत असल्यामुळे काल शुक्रवारी 6 -7 रेल्वेगाड्या गदग, होस्पेट आणि कोट्टूरू मार्गे वळविण्यात आल्या होत्या. बेळगावहून बेंगलोरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्याही होस्पेट मार्गे वळविण्यात आल्या आहेत. आपला नेहमीचा मार्ग सोडून अन्य मार्गाने या रेल्वे धावणार असल्यामुळे बेंगलोरला पोहोचण्यासाठी त्यांना 8 ते 10 तास उशीर होणार आहे.
दरम्यान, रेल्वे गाड्या होस्पेट मार्गाने वळवण्यापूर्वी प्रवाशांची किती गैरसोय होणार आहे हे बहुदा रेल्वे खात्याने लक्षात घेतले नसावे असे वाटते. कारण सदर मार्गावर जेवणखान तर दूरच पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त आहे.
रेल्वेतील शौचालय पाणी संपल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरवणार आहे. आजारी प्रवासी अधिकच आजारी पडण्याची शक्यता आहे. नोकरदार मंडळींना वेळेवर कामावर पोचता येणार नाही. ही सर्व गैरसोय 100 -200 जणांसाठी नाहीतर 6 हजारहून प्रवासीवर्गाच्या बाबतीत घडणार आहे. जाणकारांच्या मते मार्ग बदलाची पूर्वकल्पना रेल्वे खात्याने सर्वांना द्यावयास हवी होती. त्यामुळे लोकांनी कदाचित प्रवासासाठी दुसरा पर्याय निवडला असता.
नाहीतरी भारतीय रेल्वे दररोज 2.3 कोटी लोकांची वाहतूक करते त्यामुळे लोकांनी दुसरा पर्याय निवडला तर रेल्वेचे फारसे नुकसान होणार नाही, असे मतही व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, मयुरी नरगुंदकर यांनी माझी आई काल शुक्रवारी रात्री 9 वाजता बेळगाव -बेंगलोर (अंगडी ट्रेन) रेल्वेने बेंगलोरला गेली जी आज तब्बल सायंकाळी 5:30 वाजता बेंगलोरला पोहोचली, असे खेदाने सांगितले.