अधिकारी असोत वा लोकप्रतिनिधी त्यांनी गावातील जनतेच्या समस्यांना प्राधान्य द्यायला हवे. शिरगुप्पी ग्रामपंचायत याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल. त्यांनी गावच्या विकासाला जे प्राधान्य दिले आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे, असे मनोगत माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले.
शिरगुप्पी ग्रामपंचायतीत तक्रार निवारण बैठक झाली. यावेळी ग्रामस्थांच्या सर्व समस्या ऐकून घेऊन त्यांनी अधिकारी व पंचायतीच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थितांनी गावातील गटारी, वीज, पिण्याचे पाणी यासह विविध समस्या तालुका पंचायत अधिकारी व लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर आमदारांनी जागेवरच सर्व अधिकार्यांना या समस्या तातडीने मार्गी लावण्याची सूचना केली. गावातील जनतेला लहान-सहान समस्यांसाठी झगडावे लागू नये, त्यांच्या समस्यांकडे वैयक्तीकरित्या लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली. सरकारी काम हे देवाचे काम आहे, असे समजून तुम्ही काम केलात तर गावात समस्याच उरणार नाहीत, असेही ते म्हणाले.
आ. पाटील म्हणाले, शिरगुप्पी ही मतदार संघातील आदर्श ग्रामपंचायत आहे. पंचायतीत कोणताही कार्यक्रम झाला तरी त्याचे टीव्हीवरून थेट प्रसारण होते. शिवाय समारंभांची माहिती देखील ध्वनीक्षेपकावरून दिली जाते, ही बार खरोखरच कौतुकास्पद आहे. ग्रामपंचायतीचे आदर्श काम पाहून अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. हे तुमचे यश म्हणजे गावच्या एकजुटीचा परिपाक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या समस्यांना प्राधान्य द्यावे. तुमच्यात एकी असल्यानेच हे साध्य झाले आहे. भविष्यात यापेक्षाही अधिक एकजूट दाखवून गावचा विकास करून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तालुका पंचायतीतील विविध खात्याचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष, सदस्य, प्रतिष्ठीत नागरिक, भाजपचे नेते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.