सांबरा आणि परिसरातील शिवारांमध्ये सध्या खरीप भात पेरणीला जोमाने प्रारंभ झाला आहे. बैलजोडीसह ट्रॅक्टरच्या चार नांगरटाळानी शेतकरी हंगाम साधताना दिसत आहेत.
मान्सून पूर्व रोहिणी नक्षत्राच्या अगोदर यंदा अधूनमधून चांगला पाऊस झाला असल्यामुळे पूर्व मशागतीची कामे झाली आहेत रोहिणी नक्षत्रात पाऊस झाल्याने मृग नक्षत्रात चांगला पाऊस होणार असे अनुमान शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी मृगनक्षत्र सुरू होताच पास्ते 11 जून पर्यंत दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर पुन्हा पावसाने उघडीप दिली होती. यंदा प्रत्येक शेतकऱ्याने पेरणी हंगामासाठी जुळवाजुळव केली आहे. बियाणांची खरेदीही झाली असून सांबरा आणि परिसरातील शिवारांमध्ये शेतकरीवर्ग सध्या भात पेरणीमध्ये गर्क असल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या पाच वर्षापासून निसर्ग बदलला असल्याने पेरणीच्या हंगाम व सुगीचा हंगाम यात फरक पडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रासायनिक खतांचे दर 25 टक्क्यांनी वाढले असून युरिया खताची किंमत मात्र 300 रुपये अशी ‘जैसे थे’ आहे. पेरणीकरिता बहुतांश शेतकरी मिश्र खतांचा वापर करीत आहेत.