सांबरा, बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलचे नूतन स्टेशन कमांडर म्हणून एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात मावळते स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन अरुण मुत्तू यांनी आपल्याकडील अधिकार पदाची सूत्रे नूतन स्टेशन कमांडर एअर कमोडोर एस. श्रीधर यांच्याकडे सुपूर्द केली.
भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर विभागात 14 जून 1989 रोजी अधिकारी म्हणून रुजू झालेले एस. श्रीधर हे कोरुकोंडा सैनिक स्कूल आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्या 33 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी भारतीय हवाईदलाच्या विभिन्न विमानांचे 5000 तासांचे हवाई उड्डाण केले आहे.
हेलिकॉप्टर युनिटचे नेतृत्त्व करणाऱ्या श्रीधर यांनी जम्मू काश्मीर आणि अंदमान निकोबार या ठिकाणी हवाई दलाच्या मोहिमांमध्ये चिफ ऑपरेशन ऑफिसर म्हणून यशस्वी भूमिका निभावली आहे.
एयरफोर्स कंपोनेंट कमांडर म्हणून नियुक्ती झालेल्या श्रीधर यांनी 1993 आणि 2005 मध्ये एअर कमांडिंग इन चीफ आणि कमांडर इन चीफ अंदमान-निकोबार यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे.
हवाई दलातील उत्तम कामगिरीबद्दल एअर कमोडोर एस. श्रीधर यांना 2011साली वायूसेना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.