सुभाषनगर येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयाला नुकत्याच झालेल्या नॅक मूल्यमापनामध्ये ‘ए प्लस’ ग्रेड मिळाला असून या पद्धतीने बेळगाव शहराच्या इतिहासात प्रथमच मराठा मंडळाने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान पदवी महाविद्यालयाने यापूर्वी तीन नॅक यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. आत्ताच्या चौथ्या नॅकमध्ये या महाविद्यालयाला ‘ए प्लस’ ग्रेड मिळाल्यामुळे संस्थेच्या अध्यक्षांसह प्राचार्य व प्राध्यापक वर्गावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नॅकच्या राष्ट्रीय मूल्यांकन समितीच्या सदस्यांनी नुकतीच गेल्या 23 व 24 जून रोजी मराठा मंडळ पदवी महाविद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंग आणि वारीच्या माध्यमातून नॅक टीमचे स्वागत केले होते.
शिवाय एनसीसी छात्रांनी त्यांना मानवंदना दिली होती. महाविद्यालयाच्या परीक्षणासाठी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, जयश्री घोष, संयोजक वेंकटाचलम कुरुमा आणि नॅक अधिकारी डॉ. डी. के. कांबळे उपस्थित होते. दोन दिवसाच्या परीक्षणादरम्यान नॅक कमिटीने प्राचार्य आणि विविध विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी -विद्यार्थिनी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने परीक्षण कार्याची सांगता झाली. यावेळी प्राचार्य प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान महाविद्यालयाला ए प्लस ग्रेड मिळाल्याबद्दल प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर यांनी सर्वप्रथम संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांचे आभार मानून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
शिवाय या यशाचे श्रेय माझ्या एकट्याचे नसून सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आहे, असेही त्यांनी सांगितले.