गावातील धार्मिक जागेसंदर्भात बेळगाव नजीकच्या होन्याळ गावच्या ग्रामस्थांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाला घेराव घालून निदर्शने केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली.
याबाबत असे समजते की, बेळगाव शहरानजीक असलेल्या होन्याळ गावातील एका धार्मिक जागेवर अन्य समुदायाकडून अतिक्रमण होत आहे. परिणामी गावात वाद निर्माण झाला आहे.
यासंदर्भात न्याय मिळावा यासाठी होन्याळ गावातील नागरिकांनी आज बेळगाव ग्रामीण क्षेत्राच्या सहाय्यक पोलीस उपायुक्तांच्या (एसीपी) कार्यालयाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जाऊन कार्यालयाला घेराव घातला.
तसेच धार्मिक जागेच्या बाबतीत आपल्याला न्याय मिळावा यासाठी निदर्शने केली. यावेळी संबंधित धार्मिक जागेच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
याप्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांनी संबंधित वाद मिटविण्यासाठी योग्य तो तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिल्याचे समजते.