देशासह राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अपार्टमेंट्स, कार्यालय आणि शैक्षणिक संस्थांसाठी कोरोना मार्गदर्शक सूची जारी केली आहे.
सरकारच्या मार्गदर्शक सूचीनुसार ज्या व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून येतील त्यांचे अलगीकरण करून उपचार केले जातील. रुग्णांची वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार घर, कोविड केअर सेंटर अथवा हॉस्पिटल या ठिकाणी हे अलगीकरण करण्यात येईल. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्याने कर्नाटक सरकारने त्यासंबंधीची मार्गदर्शक सूची जारी केली आहे.
बेंगलोर येथे गेल्या 10 जूनपासून कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आरोग्य खात्याने राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या (टीएसी) शिफारशीवरून गेल्या मंगळवारी कोरोना तपासणी, अलगीकरण (आयसोलेशन), उपचार आणि विलग्नवास (क्वारंटाईन) यासंदर्भात अपार्टमेंट बिल्डिंग्ज, कार्यालयं आणि शाळांसह बारावीपर्यंत वर्ग चालविणाऱ्या शैक्षणिक संस्था यांच्यासाठी मार्गदर्शक सूची जारी केली आहे.
अपार्टमेंटसाठी तीन ते पाच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास अपार्टमेंटच्या त्या ब्लॉक असलेल्या मजल्यावरील लोकांसह लक्षणे आढळणाऱ्या सर्व रुग्णांची रॅपिड अँटीजन टेस्ट (आरएटी) केली जावी.
जर पाच किंवा त्यापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास अपार्टमेंट अथवा टॉवरमधील लक्षणे आढळणाऱ्या सर्व रहिवाशांची कोरोना तपासणी केली जावील. त्याचप्रमाणे 15 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यास अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील सरसकट सर्वांचीच कोरोना तपासणी केली जावी, असे मार्गदर्शक सूचित नमूद आहे.