नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) यूजीसी नेट परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून येत्या 8,9,11,12 जुलै आणि 12,13,14 ऑगस्ट 2022 रोजी या परीक्षा होणार आहेत.
यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदेश कुमार यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक लवकरच nat.ac.in आणि ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहे. ही ऑनलाईन माध्यमातून घेतली जाणारी परीक्षा आहे. देशातील महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ आणि ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप व असिस्टंट प्रोफेसर’ या पदांसाठी भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी यूजीसी नेट घेतली जाते.
दिवसभरात दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत अशा प्रत्येकी तीन तासाच्या कालावधीत ही परीक्षा घेण्यात येते. यूजीसी नेट जेआरएफ परीक्षा वर्षातून दोनदा होते.
गतवर्षी कोरोनामुळे डिसेंबर 2021 मध्ये होणारी यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर यूजीसीने एनटीएसह जून 2022 मधील सत्र परीक्षा तसेच डिसेंबर 2021 ची प्रलंबित परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार ही परीक्षा होत असून एकूण 82 विषयातील विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत.