मराठा युवा उद्योजकांना संघटित करून त्यांच्या व्यवसायाबद्दल, त्यांच्या असलेल्या अडीअडचणी दूर करून सर्व प्रकारे सहकार्य करण्यासाठी मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यावतीने येत्या रविवार दि. 3 जुलै 2022 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मराठा युवा उद्योजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
गणेश कॉलनी संभाजीनगर, वडगाव येथील मराठा सभागृहामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये मराठा समाज सुधारणा मंडळ बेळगावचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, माजी महापौर किरण सायनाक, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक राजेंद्र मुतगेकर, शिव संस्कार उद्योग मित्र गोव्याचे अध्यक्ष बी. एम. चौगुले, माजी नगरसेवक नेताजी जाधव, यश ऑटोचे मालक संजय मोरे, निवृत्त प्राचार्य महादेव कानशिडे, आर्किटेक्ट व इंजिनियर आर. एम. चौगुले, माजी मुख्याध्यापक शंकर पुन्नाप्पा चौगुले आणि मराठा मोर्चा बेळगावचे समन्वयक महादेव पाटील हे मान्यवर युवा उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.
मराठा समाजातील बरेच युवक कांही वादी संघटना आणि राजकीय पक्षांमध्ये अडकत चालल्यामुळे या सर्व युवकांच्या डोक्यातून स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून समृद्ध आणि धनवान होण्याची संकल्पनाच निघून गेली आहे. त्यामुळे या समाजाचे बरेच युवक ऐनउमेदीत प्रचंड ध्येयवादी बनण्यापेक्षा अति निराशवादी बनत चालले आहेत.
मराठा युवकांमधील नेमकी हीच कमतरता दूर करण्यासाठी आणि त्यांना ध्येयवादी बनवण्यासाठी भारतातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि प्रचार प्रसार माध्यम या सर्व क्षेत्रांमध्ये मराठा साम्राज्य निर्माण करण्याची शपथ मराठा सेवा संघाने घेतली आहे.
त्यासाठी मराठा युवक उद्योजकांना संघटित करून त्यांच्या व्यवसायाबद्दल त्यांच्या असलेल्या अडीअडचणी दूर करून त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार आहे. तरी मराठा समाजातील युवा उद्योजकांनी याची नोंद घेऊन येत्या 3 जुलै रोजी आयोजित मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.