येत्या जुलै ते डिसेंबर अशा 6 महिन्यांसाठी ग्राहकांकडून इंधन खर्च समायोजन शुल्क आकारणीद्वारे वीज दरांमध्ये सुधारणा करण्यात यावी या मागणीचा वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी (हेस्कॉम) सादर केलेला प्रस्ताव कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) मंजूर केला आहे.
केईआरसीच्या मंजुरीमुळे काढण्यात आलेल्या आदेशानुसार हेस्कॉमच्या कार्यक्षेत्रातील ग्राहकांना पुढील तिमाहित समायोजन (ॲडजेस्टमेंट) शुल्काच्या स्वरूपात प्रति युनिट 27 पैसे जादा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. बेस्कॉम, मिस्कॉम आणि जिस्कॉम यांच्या वीजदरात देखील अनुक्रमे प्रति युनिट 31 पैसे, 21 पैसे आणि 26 पैसे अशी दरवाढ होणार आहे.
ही दरवाढ पाहता सरासरी जे ग्राहक 200 युनिट विजेचा वापर करतात त्यांना ज्यादाचे 40 रुपये मोजावे लागणार आहेत. एकंदर आता 2021 -22 च्या गेल्या दोन तिमाहीमध्ये करण्यात आलेली प्रति युनिट वीज बिल वसुली आगामी तिमाहीमध्ये पाचही इस्कॉमच्या ग्राहकांच्या बिलामध्ये प्रतिबिंबित होणार आहे.
दरम्यान, राज्य सरकारने वीज दरवाढीचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. कोळसा आणि पेट्रोलियम उत्पादनाच्या बाजार दरावर आधारित समायोजनाच्या खर्चात फरक आहे, असे ऊर्जा राज्यमंत्री व्ही. सूनिलकुमार यांनी काल मंगळवारी सांगितले.
वर्षातून एकदाच वीज दरात सुधारणा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे जनतेने दरवाढीच्या अपरिचित चिंता करण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.