खबरदारीची उपाययोजना म्हणून आज भल्या पहाटे शहरातील 26 गुंडांच्या घरांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. अजूनही कांही गुंड आहेत ज्यांची यादी तयार केली जात असून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.
धाडी टाकण्याची ही मोहीम निरंतर प्रक्रिया असणार असून यापुढेही गुंड -गुन्हेगारांच्या घरांवर धाडी टाकल्या जातील, असे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी स्पष्ट केले.
शहरातील आपल्या कार्यालयांमध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आज सकाळी शहर आणि परिसरातील 26 गुंडांच्या घरांवर धाडी टाकण्यात आले आहेत
यासाठी एसीपी आणि सीपीआय यांच्या नेतृत्वाखाली सव्वीस पथके स्थापन करण्यात आली होती. प्रत्येक पथकात आठ ते दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या धाडसत्रा दरम्यान कांही गुंडांकडे प्राणघातक शस्त्रे सापडली आहेत.
भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार त्या गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हाती घेतला जाणार आहे. शहरातील गुंडांची माहिती घेण्यासाठी लवकरच रौडीपरेड घेतली जाणार असून गुंडा कायद्याखाली दोघा गुंडांना नुकतेच तडीपार करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे आणखी दोघा गुन्हा तडीपार करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी सांगितले.