भरधाव वेगाने रॉंग साईडने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून रस्त्यावर कोसळलेली एक महिला दैव बलवत्तर म्हणून ट्रक खाली सापडण्यापासून बचावल्याची घटना आज गणेशपुर रोड येथे घडली.
सदर श्वास रोखणारी घटना रस्त्याशेजारी इमारतीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली आहे. गणेशपुर रोड या दुपदरी मार्गावर आज गुरुवारी सकाळी एक दुचाकीस्वार महिला भरधाव वेगाने निघाली होती. या महिलेने सुसाट वेगात रस्त्यावर जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला आणि ट्रकला रॉंग साईडने ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नात दुचाकी घसरून संबंधित महिला थेट ट्रक समोर रस्त्यावर कोसळली तिचे दैव बलवत्तर म्हणून ट्रक चालकाने ब्रेक लावत ट्रक जागच्याजागी थांबविला. त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. त्यानंतर रस्त्यावर कोसळल्याने जखमी झालेल्या त्या दुचाकीस्वार महिलेला नागरिकांनी रस्त्यावरून बाजूला नेले.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील वेळेनुसार आज गुरुवारी सकाळी 8:24 च्या सुमारास ही घटना घडली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक वेळीच थांबविला नसता तर संबंधित दुचाकीस्वार महिलेला आज निश्चितपणे आपले प्राण गमवावे लागले असते, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शीमध्ये व्यक्त होत होती. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने हाकण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत.
युवकांबरोबरच कांही अतिउत्साही युवती आणि महिलाही यामध्ये आघाडीवर असतात. यापैकी एक महिला आजच्या गणेशपूर रोडवरील घटनेमुळे शहाणी झाली असावी. डाव्या बाजूने रॉंग साईडने समोरील वाहनाला ओव्हरटेक करणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालणे, हे तिच्या लक्षात आले असावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.