विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा मानला जाणारा दहावीचा निकाल जाहीर झाला असून आज गुरुवारी दुपारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री नागेश यांनी बंगळुरू -मल्लेश्वरम येथे एसएसएलसीचा निकाल घोषीत केला. या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे.
यंदाच्या एसएसएलसी अर्थात दहावीच्या निकालांमध्ये राज्यात सर्वात मोठा शैक्षणिक जिल्हा मानला जाणाऱ्या बेळगाव जिल्ह्याने समाधानकारक कामगिरी बजावली आहे. बेळगाव आणि चिक्कोडी अशी दोन शैक्षणिक जिल्ह्यांची विभागणी झाली असून दोन्ही जिल्हे ‘ए ग्रेड’ मध्ये आहेत.
राज्यात एकूण 7 लाख 30 हजार 881 विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले असून 85. 53 टक्के निकाल लागला आहे. या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या 10 वर्षातील हा सर्वात चांगला निकाल आहे, असे शिक्षण मंत्री नागेश यांनी स्पष्ट केले आहे.
यावर्षी कोणत्याही शैक्षणिक जिल्ह्यासाठी रॅकिंगची घोषणा करण्यात आली नाही. बेंगलोर दक्षिण आणि यादगिरी हे जिल्हे ‘बी ग्रेड’मध्ये असून राज्यातील उर्वरित 32 जिल्हे हे ‘ए ग्रेड’ मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात एकूण 145 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी म्हणजे 625 पैकी 625 गुण मिळवले आहेत.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याने या वर्षीच्या दहावीच्या निकालामध्ये विशेष यश मिळविले आहे. त्यामुळे जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज मलतवाड यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी बेळगाव जिल्ह्याचे नांव उज्ज्वल केले असून ते अभिनंदनासाठी पात्र आहेत, असेही मलतवाड यांनी म्हटलंय. पुढील दिवसांमध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यावर आणखी काम केले जाईल. त्यामुळे विद्यार्थी आपल्या जिल्ह्याचे नांव आणखी उज्वल करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.