सकल मराठा समाज बेळगावच्यावतीने आज वडगांव येथील आदर्श विद्या मंदिराच्या मैदानावर आयोजित जगद्गुरु वेदांतचार्य परमपूज्य मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून उत्साही कार्यकर्त्यांनी काल रात्रीपासून संपूर्ण शहर भगवामय केले आहे.
मराठा समाजाच्या बेंगलोर येथील गोसावी मठाचे 7 वे मठाधीश जगद्गुरु वेदांतचार्य प. पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांच्या गुरुवंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बेळगाव शहरात पहिल्यांदाच मराठा समाजाचे विराट स्वरूप प्रकट होणार आहे. सदर कार्यक्रमाची सकल मराठा समाजातर्फे सर्वांगाने जय्यत तयारी करण्यात आली आहे. या तयारीचा भाग म्हणून काल संपूर्ण रात्र जागून मराठी मावळ्यांनी शहराचे सुशोभिकरण केले. गुरुवंदनेनिमित्त शहरात विशेष करून कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या मार्गांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेतच. याखेरीज कार्यकर्त्यांनी काल शनिवार संपूर्ण रात्र झटून शहरातील प्रमुख मार्गांसह गल्लोगल्ली मराठा समाजाची शान आणि अभिमान असलेले सुमारे 15 हजारांहून अधिक भगवे ध्वज लावून शहरासह उपनगरे भगवीमय करून टाकली आहेत.
प. पू. श्री मंजुनाथ भारती स्वामीजींच्या गुरुवंदना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्येने मराठा समाज असणाऱ्या भागात आज सकाळपासून विशेष उत्साही वातावरण पहावयास मिळाले. दरम्यान गुरुवंदना कार्यक्रमाच्या ठिकाणी आदर्श विद्यामंदिर शाळेच्या मैदानावरील भव्य शामियान्यात मोठे व्यासपीठ उभारण्याबरोबरच 20 हजाराहून अधिक लोकांची बसण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कार्यक्रमास येणार्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आदर्श विद्यामंदिरकडून शहापूरकडे येणाऱ्या मार्गावर करण्यात आली आहे. छ. शिवाजी महाराजांचे पिता शहाजीराजे भोसले यांनी बंगळूर येथे मराठा समाजाचा मठ स्थापन केला होता त्या मठाच्या गादीवर मराठा समाजाचे सातवे धर्मगुरू श्री मंजुनाथ भारती स्वामी यांचा नुकताच पट्टाभिषेक झाला आहे. या मठाची समाजाला माहिती मिळावी, विखुरलेला मराठा समाज एकत्रित व्हावा, समाजाला विधायक दिशा मिळावी यासाठी आजचा गुरुवंदना कार्यक्रम होणार आहे.