शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या बेळगाव मधील शिवजयंती उत्सवाचे यंदाचे 103 वे वर्ष मोठ्या उत्साहात साजरे होत आहे. बेळगावचा शिवजयंती उत्सव ही शिवप्रेमींसाठी पर्वणी असते. केवळ बेळगाव शहरात नाही तर पंचक्रोशीतील शिवप्रेमी कोणतीही तमा न बाळगता ऐतिहासिक चित्ररथ मिरवणुकीत सहभाग घेतात.
शहरातील ठराविक मार्गावरून मार्गस्थ होणारी ही मिरवणूक पाहण्यासाठी बेळगाव शहर तसेच तालुका आणि उपनगरातील शिवप्रेमी हजारोंच्या संख्येने दाखल होतात. अगदी सायंकाळी सुरू झालेली ही मिरवणूक दुसरे दिवशी पहाटे पर्यंत तितक्याच जोमाने आणि उत्साहाने साजरी होते.
चित्ररथ पाहण्यासाठी दाखल झालेल्या शिवप्रेमींना पाण्याची, सरबताची तसेच अल्पोपहाराची सोय शिवसेना युवा सेना आणि अनेक स्थानिक समाजसेवी संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. मारुती गल्लीच्या कोपऱ्यावर शिवसेना युवा सेनेच्या वतीने तमाम शिवप्रेमींसाठी पाणी आणि सरबताची सोय करण्यात आली होती. चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी दाखल झालेल्या शिवप्रेमी याचादेखील आनंद घेतला.
अलोट शिवभक्तांच्या गर्दीत ऐतिहासिक चित्ररथ मिरवणूक
बेळगावच्या शिवजयंती उत्सवाला अनोखे महत्त्व आहे. छत्रपती शिवराय आणि बेळगाव मधील शिवभक्त यांच्यात अतूट असे नाते आहे, याच शिवभक्तिचा प्रत्यय आज बेळगाव मधील गल्लोगल्ली अनुभवता येत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि विविध मान्यवरांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी मानाच्या पालखीचे पूजन झाल्यानंतर बेळगाव मधील ऐतिहासिक चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ झाला. लेझीम, ढोल- ताशा पथक, पारंपारिक वाद्यवृंद, वारकरी संप्रदायाचा भजनी ठेका, फटाक्यांची आतषबाजी आणि यासह डीजे डॉल्बीच्या दणदणाटात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मार्गस्थ होत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शिवजयंती बेळगाव मध्ये साजरी झाली नाही. परंतु यंदा सरकारने कोरोना संदर्भातील निर्बंध पूर्णपणे हटविल्याने अभूतपूर्व उत्साहात पुन्हा एकदा बेळगावकर शिवजयंती जोमाने साजरी करत आहेत.
बेळगाव शहर आणि उपनगरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळाचे चित्ररथ मिरवणुकीत दाखल झाले असून शिवकालीन इतिहासावर आधारित सजीव देखावे चित्ररथावर सादर केले जात आहेत. जवळपास दोन हजार कलाकार, शेकडो ढोल ताशा वादक, विविध गावातील वारकरी संप्रदायातील भजनी मंडळे, समाजप्रबोधनात्मक तसेच स्थानिक समस्यांवर आधारित सजीव देखावे चित्ररथ मिरवणुकीत सादर करण्यात येत आहेत. सायंकाळी शिवभक्तांची गर्दी काहीशी कमी होती. परंतु रात्री 11 नंतर शहरातील सर्व रस्ते शिवप्रेमींच्या गर्दीने फुलून आले आहेत. शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्व खबरदारी पोलीस विभागाच्या वतीने घेण्यात येत आहे.
धर्मवीर संभाजी चौकात राजकीय आणि शासकीय व्यासपीठावर विविध मान्यवरांच्या हस्ते चित्ररथाचे स्वागत करण्यात येत असून शहरातील प्रमुख भागात स्क्रीन वर चित्ररथ पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.