गेल्या दोन वर्षातील कोरूना कहर आणि यामुळे प्रत्येक सण उत्सव यावर आलेले निर्बंध यामुळे बेळगावच्या ऐतिहासिक शिवजयंती उत्सवात खंड पडला. मात्र दोन वर्षानंतर बेळगाव मध्ये पुन्हा एकदा अभूतपूर्व आणि रेकॉर्डब्रेक गर्दीत अवघी शिवसृष्टी बेळगाव मधील रस्त्यावर अनुभवायला मिळत आहे.
डीजे डॉल्बी विविध साउंड इफेक्ट लाईट इफेक्ट या माध्यमातून बेळगाव मधील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित अनेक सजीव देखाव्यांचे सादरीकरण आजच्या मिरवणूकीत केले आहे. शिवजन्म सोहळा ते राज्याभिषेकापर्यंत चे अनेक देखावे चित्ररथावर सादर करण्यात येत आहेत.
शतकोत्तर शिवजयंती उत्सव यंदाच्या गर्दीने खऱ्या अर्थाने भव्य दिव्य आणि अभूतपूर्व पद्धतीने साजरा होत आहे. हजारोंच्या संख्येने बेळगाव शहर, परिसर, तालुका उपनगर आणि पंचक्रोशीतील शिवप्रेमी उत्स्फूर्तपणे मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत .हजारो शिवप्रेमींच्या गर्दीने बेळगाव मधील रस्ते फुलून गेले आहेत. अनेक चित्ररथांसमोर ढोल-ताशा पथकांचे लयबद्ध वादन होत असून तरुणांसह तरुणींचा ही सहभाग लक्षणीय दिसून येत आहे.
अनेक प्रसार माध्यमांवर छत्रपती शिवरायांवर आधारित मालिका सुरू आहेत. याच प्रमाणे अलीकडच्या काळात अनेक चित्रपट देखील प्रदर्शित झाले आहेत. मालिका आणि चित्रपटातील आवाजावर आधारित चित्ररथ मिरवणुकीत देखावे साजरे करण्यात येत आहेत. अवधी शिवसृष्टी अवतरली असा आभास आज बेळगाव मधील रस्त्यावर दिसून येत आहे .
अनेक चित्ररथांसमोर लढायांचे प्रसंगही उभे करण्यात आले असून अलीकडच्या काळात शिवजयंती उत्सवात वापरण्यात येणाऱ्या डीजे चा प्रकार मात्र यंदाच्या निवडणुकीत किंचित कमी दिसून आला. यामुळे बहुतांशी चित्ररथांसमोर पारंपारिक वाद्यवृंद, लेझीम पथक, वारकरी संप्रदायातील भजनी मंडळाचे सादरीकरण आणि ढोल-ताशांचा दणदणाट अशा उत्साहपूर्ण वातावरणात चित्ररथ मिरवणूकीत दाखल होत आहे . जवळपास 55 हून अधिक चित्ररथ मिरवणुकीत सामील झाले होते . शहरातील अनेक मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले असून बेळगावच्या अभूतपूर्व गर्दी समोर पोलीस बंदोबस्त फिका पडल्याचे दिसून आले.