शिवरायांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेल्या अनेक शिवभक्तांची उदाहरणे आपण पहात आलो आहोत. परंतु बेळगाव आणि छत्रपती शिवराय यांचे नाते हे एका वेगळ्या स्तरावर आहे. प्रत्येक चौकाचौकात छत्रपती शिवरायांची मूर्ती स्थापन केलेली आजवर आपण पहात आलो आहोत.
मात्र आता घराघरावर देखील मूर्ती स्थापन करण्याचा ट्रेंड रुजू होत चालला आहे. ताशीलदार गल्ली येथील गौरंग गेंजी, त्यानंतर बसवणं कुडची येथील नागेश दिवटे आणि आता वडगाव येथे भूषण आणि संदीप पाटील या दोन्ही भावंडांनी शिवरायांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. तनामनात स्फूर्ती आणि शिवरायांच्या भक्तीने संचारलेल्या बेळगाव मधील शिवभक्तांनी आपल्या घरावर शिवरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तसेच परंपरेप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने ज्ञानेश्वर नगर गाडे मार्ग वडगाव येथील भूषण रमेश पाटील आणि संदीप रमेश पाटील या दोन्ही भावंडांनी शिवरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना गगनचुंबी इमारती वर केली आहे. सदर मूर्ती संजय किल्लेकर यांनी साकारली आहे.
परिसरातील पंच आणि मान्यवर तसेच शिवभक्तांच्या उपस्थितीत शिव मूर्तीचे अनावरण करण्यात आले.सदर शिवमुर्ती आसपास परिसरातून जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावरूनही सहजपणे दिसू शकेल इतक्या उंचीवर या शिवमुर्ती ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
शिवभक्ती ने भारलेल्या या दोन्ही भावंडांनी शिवरायांप्रती असलेला आदर अशा अनोख्या पद्धतीने व्यक्त केल्याने सर्व शिवभक्तातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.