Sunday, April 21, 2024

/

शिवजयंती मिरवणुकीसाठी देण्यात आल्या ‘या’ उपयुक्त सूचना

 belgaum

दोन वर्षाच्या खंडानंतर उद्या बेळगावात सोडण्यात येणाऱ्या पारंपारिक भव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर धर्मवीर संभाजी चौक तेथे प्रेक्षक गॅलरी उभारावी, या चौकातील महाराजांच्या पुतळ्यास समोरील दगड माती तात्काळ हटवावी आदी उपयुक्त सूचना बेळगाव मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ तसेच शहापूर शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगाव पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना केल्या असून त्यांनी त्या सूचनांचे स्वागत करून अंमलबजावणीचे आश्वासन दिले आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष बेळगावातील पारंपारिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक होऊ शकली नव्हती. मात्र कोरोना निवळल्यामुळे आणि निर्बंध मागे घेण्यात आल्यामुळे यंदाची शिवजयंती मिरवणूक पूर्ण जोष -जल्लोषात निघणार आहे. मिरवणूक सुरळीत शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व त्या उपाययोजना आणि खबरदारी घेतली आहे. तथापि प्रशासनाच्या मिरवणुकी संदर्भातील पूर्वतयारीमध्ये असलेल्या काही उणिवा भरून काढताना शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी माजी नगरसेवक नेताजी जाधव, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, गणेश दड्डीकर व महेश जुवेकर यांनी पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना कांही उपयुक्त सूचना केल्या आहेत. उभय अधिकाऱ्यांनी या सूचनांचे स्वागत करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे.

या सूचनांपैकी पहिली सूचना म्हणजे शिवजयंती मिरवणूक मार्गावर यंदे खूट वनिता विद्यालय येथून धर्मवीर संभाजी चौकापर्यंत शिवप्रेमींच्या सोयीसाठी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात यावी. धर्मवीर संभाजी चौक येथे दरवर्षी महाराजांच्या मूर्ती समोरील जागेत एका स्थानिक वृत्तवाहिनीचा स्वागत मंडप उभारला जातो. यावेळी देखील तो उभारला जाणार आहे. मात्र सध्या त्या मोकळ्या जागेत ध. संभाजी चौक सुशोभिकरणासाठी आणलेली दगड-माती अद्याप तशीच पडून आहे. यामध्ये कांही बांधकामाचे साहित्य देखील आहे. याचा अडथळा निर्माण होऊ अनकुचीदार दगड व साहित्यामुळे लोकांना इजा होण्याचा संभव असल्यामुळे त्याठिकाणची साफसफाई केली जावी.

मिरवणूक सुरळीत पार पडावी यासाठी मिरवणूक मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तसेच ड्रोनची ही सोय करण्यात आली आहे. तथापि मिरवणूक मार्गावरील कांही भाग असे आहेत की ज्या ठिकाणी छोटे अंधकारमय गल्लीबोळ आहेत. या गल्लीबोळांचा मिरवणुकीदरम्यान गैरवापर होऊन विघ्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी संबंधित गल्ली-बोळांच्या ठिकाणी मोठे हॅलोजनचे दिवे बसवले जावेत.

बेळगावच्या पारंपारिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीची सांगता श्री कपिलेश्वर मंदिर तेथे होते. यंदा दोन वर्षाच्या खंडानंतर होणाऱ्या या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा आनंद सर्वांना लुटता यावा यासाठी मिरवणूक मार्गावर 8 पॉईंट करण्यात आले आहेत. सिंडिकेट बँक मारुती गल्ली, मारुती मंदिर मारुती गल्ली, हुतात्मा चौक, संयुक्त महाराष्ट्र चौक, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, टिळक चौक आणि हेमु कलानी चौक असे हे 8 पॉइंट आहेत. या ठिकाणी प्रत्येक चित्ररथ कांही काळ थांबून देखावे आणि शिवकालीन मर्दानी खेळ सादर करणार आहेत. हे आठ पोइंट योग्य असले तरी ध. संभाजी चौक येथून दुसरा जो पॉईंट आहे तो टिळक चौक आहे. हे अंतर खूपच जास्त असल्यामुळे या दोन्ही पॉईंटमध्ये सम्राट अशोक चौक येथे आणखी एक 9 वा पॉईंट निर्माण करावा. जेणेकरून संबंधित भागात उपस्थित असलेल्या सर्व शिवप्रेमींसाठी ते सोयीचे होईल.

चित्ररथ यांसाठी मिरवणूक मार्ग अनुकूल व्हावा यासाठी या मार्गावरील खाच-खळगे बुजवून युद्धपातळीवर रस्त्याचे पॅचवर्क केले जावे. विशेष करून रामदेव गल्ली येथील गटारांवरील फुटलेल्या फरशा नव्याने बसविल्या जाव्यात. त्याचप्रमाणे कपलेश्वर उड्डाणपुलाच्या शनि मंदिराच्या बाजूला असलेली धोकादायक चर बुजवण्यात यावी. या व्यतिरिक्त मिरवणूक मार्गावर ज्या -ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, त्या ठिकाणचे वाळू, विटा, खडी आदी बांधकामाचे साहित्य रस्त्यावरून हटविण्यास सांगण्यात यावे. शिवप्रेमी जनता आणि प्रशासनाला अनुकूल होऊन शिवजयंती चित्ररथ मिरवणूक सुरळीत पार पडावी या दृष्टिकोनातून उपरोक्त सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच या सूचनांची अंमलबजावणी होणार का? हे आता उद्याच स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.