आयुष्याचा प्रत्येक क्षण आपल्या अपघातग्रस्त अंथरुणाला खेळून असलेल्या मुलाला पुन्हा त्याच्या पायावर उभे करण्यासाठी खर्च करणाऱ्या रोहिनी तेंडुलकर यांना आशेचा किरण दिसला असून डॉक्टरां त्यांचा मुलगा उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे रोहिणी यांनी आपल्या मुलासाठी पुन्हा आर्थिक सहाय्याचे आवाहन केले आहे.
रोहिणी तेंडुलकर यांचा एकुलता एक मुलगा औदुंबर हा अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे गेल्या 2019 पासून हॉस्पिटलमध्ये अंथरुणाला खिळून आहे. अपघातात औदुंबर याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. गेली तीन वर्षे त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आपल्या मुलाचा जीव वाचवून त्याला खडखडीत बरे करून त्याच्या पायावर उभे करण्याचे खडतर आव्हान रोहिणी तेंडुलकर यांनी स्वीकारले आहे. आपल्या मुलावरील उपचारासाठी त्यांनी आपले घरदार सर्व काही पणाला लावले आहे. तथापि उपचाराचा खर्च मोठा असल्यामुळे त्यांना सातत्याने आर्थिक गरज भासत आहे. यासाठी त्यांना फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर प्रारंभापासून सातत्याने त्यांच्या संपर्कात राहून सहकार्य करत आहेत. बेळगाव लाईव्हने दखील औदुंबरच्या मदतीसंदर्भातील वृत्त यापूर्वी वेळोवेळी प्रसिद्ध केले आहे.
आता हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी औदुंबर हा उपचाराला प्रतिसाद देत असून तुम्ही त्याला कृत्रिम आधाराच्या सहाय्याने (सर्जिकल सपोर्ट) उठायला, बसायला आणि चालायला सांगा, त्याला मदत करा, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे चिंतित मनाने आपल्या मुलाची शुश्रुषा करणाऱ्या रोहिणी तेंडुलकर यांना मोठा आनंद झाला असून त्यांचा हुरूप वाढला आहे.
आता औदुंबरच्या उपचाराच्या खर्चासह त्याच्यासाठी कृत्रिम आधाराची साधने खरेदी करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज असून दानशूर व्यक्ती अथवा सेवाभावी संस्थांनी यासाठी आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन रोहिणी तेंडुलकर यांनी केले आहे. मदत करू इच्छिणाऱ्यांनी रोहिणी तेंडुलकर : संपर्क क्र. 7026723434, बँक खाते क्र. 10226856664, आयएफएससी :एसबीआयएनओ 002217 येथे मदत जमा करावी. (गुगल पे अथवा फोन पे करू नये.)