बेळगाव शहर परिसरात काल मंगळवारी दुपारनंतर पडलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी काल रात्री महापालिका आयुक्त तसेच अन्य अधिकाऱ्यांसमवेत शहराचा पाहणी दौरा केला.
बेळगाव शहर परिसराला काल मंगळवारी दुपारनंतर ढगाळ वातावरणासह पावसाने झोडपले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी काल मंगळवारी रात्री 9 नंतर शहराचा पाहणी दौरा केला.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी निप्पाणीकर, आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. या सर्वांसमवेत काल रात्री 9 वाजल्यापासून जवळपास रात्री 11:30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी पाटील यांनी पिरनवाडी क्रॉस, जुना पी. बी. रोड, खासबाग, केएलई हॉस्पिटल रोड तसेच शहराच्या अन्य कांही भागात पायी चालत पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करून माहिती घेतली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान शहराच्या मध्यवर्ती भागात साचलेल्या कचऱ्याची गंभीर दखल घेताना तो त्वरित हटविण्यात यावा अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महापालिका आयुक्तांना केली.
त्याचप्रमाणे पावसाळ्यात शहराच्या सखल भागात साचणाऱ्या पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी तात्काळ उपाय योजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली.