संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात असलेली बेळगाव येथील सुमारे 700 एकर गवताचे कुरण असलेली जमीन प्रत्यक्षात कर्नाटक राज्य सरकारची आहे. त्यामुळे ही जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी आम्ही केली असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी झालेल्या बैठकीप्रसंगी बेळगाव येथील संबंधित 700 एकर जमिनी संदर्भातील मुद्दा उपस्थित झाला.
बेळगावातील या जमिनीमध्ये राज्य सरकारकडून माहिती तंत्रज्ञान प्रकल्प अर्थात आयटी पार्क उभारण्याची योजना आहे. याची माहिती संरक्षण मंत्री यांना दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बेळगावातील संगोळ्ळी रायण्णा मिलिटरी स्कूलच्या बाबतीतील अटींसंदर्भातील मागणी संरक्षण मंत्र्यांनी मान्य केली आहे. त्यांना आम्ही शाळेच्या उद्घाटन समारंभात देखील निमंत्रित केले आहे, असे बोम्मई यांनी सांगितले.