बेळगाव शहराच्या स्वच्छता कामाचे कंत्राट घेण्यासाठी पुणे येथील बीव्हीजी कंपनी उत्सुक असून महापालिकेने या कंपनीच्या निविदेची तांत्रिक पडताळणी सुरू केले आहे. तांत्रिक पडताळणी निविदा वैध ठरली तर या कंपनीला शहर स्वच्छतेचा ठेका मिळू शकतो.
बेळगाव महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेत पुण्याच्या बीव्हीजी कंपनीने सहभाग दर्शविला आहे. या एकाच कंपनीची निविदा दाखल झाल्याने सिंगल टेंडरची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. तथापि महापालिकेने बीव्हीजीच्या निविदेची तांत्रिक पडताळणी सुरू केली आहे.
बीव्हीजी कंपनीने पाच पैकी चार पॅकेजसाठी निविदा दाखल केली आहे. त्यामुळे या कंपनीला ठेका मिळाला तर एका पॅकेजसाठी पुन्हा पालिकेला निविदा काढावी लागणार आहे. मात्र एकंदर परिस्थिती पाहता सध्या तरी बीव्हीजी कंपनीला शहर स्वच्छता कामाचा ठेका मिळण्याची शक्यता आहे. या कंपनीच्या निविदेची तांत्रिक पडताळणी आठवड्यात पूर्ण होणार आहे.
शहर स्वच्छता कामाचे कंत्राट देण्यासाठी बेळगाव महापालिकेने तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविली असून या प्रक्रियेत पाच पॅकेज आहेत. पहिले चार पॅकेज 4 कोटींपेक्षा जास्त रकमेचे आहेत, तर पाचवे पॅकेज दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे आहे. एकंदर या वेळेची शहर स्वच्छतेच्या कामाची निविदा सुमारे 23 कोटी रुपयांची आहे. एक वर्षासाठी हा स्वच्छता कामाचा ठेका असणार आहे.
पुण्याच्या बीव्हीजी कंपनीला शहर स्वच्छता कामाचा अनुभव असल्यामुळे या कंपनीला बेळगाव शहर स्वच्छता कामाचे कंत्राट मिळेल असा मनपा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. महापालिका हद्दीतील 47 प्रभागांच्या स्वच्छतेची जबाबदारी नव्या कंत्राटदारावर असणार आहे. याव्यतिरिक्त कुमारस्वामी लेआउट, बसवन कुडची येथील गृहनिर्माण मंडळाच्या निवासी वसाहतीच्या स्वच्छतेची जबाबदारी देखील नव्या कंत्राटदाराकडेच असणार आहे.