रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे चोर्ला मार्गे बेळगाव -गोवा रस्ता अवजड वाहनांसाठी उद्या बुधवारपासून पूर्णपणे बंद असणार आहे. गोवा सरकारने काढलेल्या आदेशानुसार उद्या दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कर्नाटक सीमेपर्यंत दत्तवाडीपासून साखळीपर्यंतचा 27 कि. मी. अंतराच्या रस्त्यावर अवजड वाहनांसाठी प्रवेश बंदी असेल.
सदर रस्ता डांबरीकरणाचे काम येत्या 15 दिवसात समाप्त होण्याची शक्यता असून यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या गोवा आणि बेळगाव वासियांना दिलासा मिळणार आहे. चोर्ला मार्गे बेळगाव -गोवा रस्त्याच्या कामाचा दर्जा उत्तम ठेवला जावा, असा सक्त आदेश गोवा सरकारने बजावला आहे.
या रस्ते कामामुळे उद्या 4 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून या मार्गावर अवजड वाहतुकीला बंदी असणार असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
बेळगाव -गोवा हा चोर्ला मार्गे जाणारा रस्ता अलीकडे कांही वर्षापासून अत्यंत खराब झाला होता. सदर रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खाचखळगे पडले असल्यामुळे तो अत्यंत धोकादायक बनला होता.
रस्त्याच्या या दुर्दशेमुळे या मार्गावर सातत्याने लहान-मोठे अपघात देखील घडत होते. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली जात होती. मात्र आता सदर रस्त्याच्या दुरुस्तीसह डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.