Thursday, April 25, 2024

/

स्वीट मार्टच्या भट्टीला संतप्त महिलांनी ठोकले टाळे!

 belgaum

स्वीट मार्केटमधील मिठाई व खाद्य पदार्थ बनवण्याची शिवाजीनगर तिसरी गल्ली येथील भट्टी स्थानिक नागरिकांसाठी मनस्ताप देणारी ठरत असून सदर भट्टी तात्काळ बंद करावी, या मागणीसाठी संतप्त महिलांनी या भट्टीलाच टाळे ठोकल्याची घटना आज सकाळी घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की शिवाजीनगर तिसरी गल्ली येथे खाद्य पदार्थ बनवण्याची एक मोठी भट्टी आहे. याठिकाणी स्वीट मार्टमधील मिठाई तसेच अन्य खाद्यपदार्थ बनवले जातात.

मात्र भट्टीचे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे सांडपाणी आणि टाकाऊ खाद्यपदार्थ ड्रेनेज पाईप लाईनमध्ये सोडले जातात. परिणामी ड्रेनेज पाईप तुंबून गल्लीतील घराघरांमधील शौचालय आणि स्नानगृहांमध्ये ड्रेनेजचे पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडते. त्यामुळे प्रत्येक घरातील आबालवृद्ध विशेष करून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मध्यंतरी ही समस्या निकालात काढण्यासाठी ड्रेनेज पाईप बदलण्यात आली होती, परंतु सांडपाणी तुंबण्याची समस्या अद्यापही ‘जैसे थे’ आहे.Shivaji nagar

 belgaum

सदर समस्येसंदर्भात यापूर्वी महापालिकेसह संबंधित अधिकार्‍यांकडे वेळोवेळी तक्रार करून देखील अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित स्वीट मार्ट भट्टी चालकाकडून आपले उखळ पांढरे करून घेऊन अधिकारीवर्ग मुग गिळून गप्प बसत असल्याचा आरोप केला जात आहे. अलीकडे संबंधित भट्टीमुळे ड्रेनेजचे सांडपाणी तुंबण्याची समस्या वारंवार उद्भवू लागल्यामुळे आज मंगळवारी संतप्त झालेल्या नागरिकांनी सदर भट्टीमध्ये शिरून पाहणी केली असता त्या ठिकाणी त्यांना स्वच्छतेच्या सर्व नियमांचे उल्लंघन करणारे अत्यंत गलिच्छ वातावरण पहावयास मिळाले. त्यामुळे परिसर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना बाबत देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

याप्रसंगी शिवाजीनगर भागाचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर, विजय पवार, गल्लीतील पंच मदन पाटील, अभिजीत अलगुंडी, नागेश सूर्यवंशी, सुनील सांबरेकर आदी उपस्थित होते. दरम्यान मोठ्या संख्येने भट्टीच्या ठिकाणी जमा झालेल्या नागरिकांपैकी संतप्त महिलांनी आज त्या भट्टीलाच टाळे ठोकले. तसेच सदर भट्टी तात्काळ बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. आता महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडून यासंदर्भात कोणती कारवाई केली जाणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.