शिवजयंती उत्सवाची मोठी परंपरा असलेल्या बेळगाव शहरात आज सायंकाळी डोळ्याचे पारणे फेडणारी भव्य शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार असून यासाठी शहरातील सर्व चित्ररथ सज्ज झाले आहेत. चित्ररथ देखाव्यांसाठी सध्या संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. विशेष म्हणजे माळी गल्ली येथील शिवजयंती उत्सव मंडळाने आज बुधवारी पहाटे 3:40 वाजताच आपला चित्ररथ सर्वप्रथम मारुती गल्लीमध्ये आणून उभा केला आहे.
शहरातील शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा शुभारंभ अधिकृतरीत्या आज सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौक येथे पालखी पूजनाने होणार आहे. तथापि चित्ररथांचे प्रामुख्याने 7:30 ते 8 वाजण्याच्या सुमारास आगमन होण्यास सुरूवात होणार असून सुमारे 55 हून अधिक चित्ररथ यंदाच्या मिरवणुकीत सहभागी असणार आहेत. नरगुंदकर भावे चौक येथे पालखी पूजन झाल्यानंतर मारुती गल्ली, रामदेव गल्ली, सयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली मार्गे टिळक चौक येथून हेमु कलानी चौकात मिरवणुकीची सांगता होणार आहे. एकापेक्षा एक सरस देखावे असणाऱ्या या मिरवणुकीमध्ये ढोल -ताशे, लाठ्या-काठ्या, लेझीम, दानपट्टा, करेला, तलवारबाजी आदींची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. ढोल-ताशांच्या सोबतीला ताजे पथकेही सज्ज असून मागील महिन्याभरापासून ढोल-ताशा तसेच इतर कलाकारांनी सराव सुरू ठेवला आहे.
बेळगावमध्ये ऐतिहासिक अशी शिवजयंती साजरी होते. त्या अनुषंगाने सध्या शरहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण असून संपूर्ण शहर भगवेमय झाले आहे. चित्ररथ सादर करणारी मंडळे आपापले चित्ररथ मिरवणूक शुभारंभाच्या ठिकाणी नेण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागली आहेत.
शिवजयंती चित्र रथावरील जिवंत देखाव्यांमध्ये सहभागी होणारे कलाकार आज दुपारी शिवकालीन पोशाख परिधान करून चेहऱ्याची रंगरंगोटी अर्थात मेकअप करण्यात व्यस्त झाल्याचे पहावयास मिळत होते. यंदा सकल मराठा समाजातर्फे देखाव्यातील कलाकारांसाठी मोफत मेकअपची व्यवस्था करण्यात आली असल्यामुळे कलाकारांना दिलासा मिळाला आहे.
शिवप्रेमींना चित्रपटांचा आनंद घेता यावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक महामंडळाने 100 हून अधिक स्वयंसेवक नेमले असून प्रत्येक मंडळाला ते सहकार्य करणार आहेत.
कोणतीही अडचण आल्यास 9964370261 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले आहे. दरम्यान बेळगाव सोबतच शहापूर विभागात मोठ्या उत्साहात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीचा शुभारंभ आज सायंकाळी 7 वाजता बॅरिस्टर नाथ पै ही चौक येथून होणार आहे.