बेळगाव शहरातील ‘ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटर’ या संस्थेचा उद्घाटन समारंभ टिळक चौक येथे अलीकडेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला.
ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटरच्या या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार, गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान बेळगाव ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते.
यांच्या हस्ते संस्थेचे आणि संस्थेच्या वाचनालयाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाची सुरुवात ॲड. प्रमोद यादवाड यांच्या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्षा वृषाली नरसगौडा यांनी सर्वांचे स्वागत केले. ॲस्ट्रो वास्तु स्टडी सेंटरचे अध्यक्ष, ज्योतिषी व वास्तू सल्लागार उत्तम गावडे यांनी संस्थेचा उद्देश आणि भावी योजनांची माहिती दिली. आपल्या बेळगाव शहरात ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र यासारख्या विषयांचा अभ्यास करण्यास उत्सुक लोकांकरिता योग्य मार्गदर्शन त्या विषयाचे पद्धतशीर व योग्य शिक्षण देणारी कोणतीही संस्था कार्यरत नाही हे लक्षात घेऊन आम्ही ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटर सुरु करीत आहोत. या संस्थेतर्फे ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, डाऊझिंग, टॅरो, रेकी, क्रिस्टल हिलिंग यासारख्या विषयांचे अभ्यासवर्ग (प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने) बेळगाव येथे घेण्यात येणार आहेत.
ज्योतिष, वास्तू यासारख्या विषयांच्या बाबतीत सर्वसामान्य लोकांच्या मनातील संभ्रम शंका दूर करून योग्य मार्गदर्शन करणे व अशा प्रकारच्या सर्व विषयांचा प्रचार आणि प्रसार करणे हे आमच्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट राहील, असे उत्तम गावडे यांनी सांगितले.
संस्थेचे सचिव विद्याधर कब्बूर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्याबरोबरच संस्थेच्या सदस्यांनी बद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना माजी आमदार संजय पाटील यांनी ज्योतिष आणि वास्तूशास्त्र कशाप्रकारे खचलेल्या, निराश लोकांना मार्गदर्शक ठरू शकते हे सांगितले आणि संस्थेच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेला शुभेच्छा दिल्या. ज्योतिष सांगणारे बरेच जण आहेत. परंतु शिकणारे कोणी नाही, याची सुरुवात बेळगावात झाली आहे याचा लोकांनी नक्की लाभ घ्यावा, असे आवाहन करत माजी आमदार पाटील यांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या संचालिका नीता दौलतकर यांनी रेकी आणि टॅरो या विषयाबद्दल आपले मत व्यक्त करताना समाजाला या गोष्टी कशा उपयुक्त ठरू शकतात याची माहिती दिली.
यावेळी संस्थेचे संचालक विनोद कुमठेकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. कुमारी क्षिती हिच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन रामगौडा यांनी केले. सुदर्शन नरसगौडा, निखिल नरसगौडा आणि संतोष नरसगौडा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले