Thursday, April 25, 2024

/

जेएल विंग मुख्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

 belgaum

बेळगाव ज्युनियर लीडर्स (जेएल) विंग मुख्यालयाच्या नागरिक कर्मचाऱ्यांचा यंदाचा 2022 सालचा वार्षिक क्रीडा महोत्सव आज शनिवारी उत्साहात पार पडला. शारीरिक तंदुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कालपासून सलग दोन दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष जेएल विंग बेळगाव मुख्यालयातील नागरी कर्मचाऱ्यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव झाला नव्हता. यंदाच्या या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्‍हणून जेएल विंगचे कमांडंट मेजर जनरल पी. एस. बाजवा उपस्थित होते. यावेळी मंजुळा गुप्ता आणि सुप्रिया पाटील यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गावडे यांनी केले.

क्रीडा महोत्सवाच्या कालच्या उद्घाटना दिवशी टी -10 क्रिकेट स्पर्धेचे दोन सामने खेळविण्यात आले. पहिल्या सामन्यात पीसी विंग संघाने प्रतिस्पर्धी कमांडो विंग संघावर विजय मिळवला. दुसर्‍या सामन्यात हेडकॉर्टर जेएल विंग ‘अ’ संघाने प्रतिस्पर्धी हेडकॉर्टर जेएल विंग ‘ब’ संघाने संघाला पराभूत केले.

 belgaum

क्रीडा महोत्सवाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी टी -10 क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पीसी विंग आणि हेडकॉर्टर जेएल विंग ‘अ’ यांच्यात खेळविला गेला. या सामन्यात पीसी विंग संघाने प्रतिस्पर्धी हेडकॉर्टर संघाला 6 गडी राखून पराभूत करत विजेतेपद मिळविले. या स्पर्धेतील मालिकावीर किताब सागर बोंगाळे यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज म्हणून सागर बोंगाळे आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आनंद तुपारे यांची निवड करण्यात आली.Jl wing sports

या क्रिकेट स्पर्धेव्यतिरिक्त 35 वर्षाखालील आणि 35 वर्षावरील पुरुष कर्मचाऱ्यांसाठी 100 मी. धावण्याची शर्यत घेण्यात आली. या शर्यतीमध्ये 35 वर्षाखालील गटात हनुमंत संगौडा, संदीप प्रथमठ आणि सागर हालण्णावर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे 35 वर्षावरील गटातील पहिले तीन क्रमांक अनुक्रमे ज्योतिबा मिसाळ, यल्लाप्पा तळवार आणि बागंबर सिंग यांनी पटकाविले.

महिला कर्मचाऱ्यांनी 50 मी. लिंबू चमच्या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेत सरिता पाटील विजेत्या ठरल्या. त्याचप्रमाणे दुसरा व तिसरा क्रमांक अनुक्रमे तृप्ती केसरकर आणि नमिता यांनी मिळविला. जेएल विंग हेडकॉर्टर कर्मचाऱ्यांच्या या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ जेएल विंगचे कमांडंट मेजर जनरल पी. एस. बाजवा यांच्या हस्ते पार पडला. यावेळी यशस्वी क्रीडापटूंना आकर्षक करंडक, चषक आणि प्रशस्तीपत्रे देऊन गौरवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.