हिप्परगी बॅरेज मधून कागवाड तालुक्यातील ऐनापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्यात सोमवारी दुसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले. तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावातील उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ऐनापूर जलसिंचन योजनेत पाणी सोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
हिप्परगी बॅरेजच्या वरील भागात येणाऱ्या कागवाड मतदार संघातील गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईची नेहमीच झळ सोसावी लागते. येथील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन श्रीमंत पाटील यांनी महिन्यापूर्वी हिप्परगी बॅरेजच्या वरील भागातील गावांना पाणी मिळवून दिले होते.
ऐनापूर उपसा जलसिंचन कालव्याअंतर्गत सोडलेल्या या पाण्याचा मदभावी, कौलगुड, सिद्धेवाडी, मंगसुळीसह या परिसरातील अनेक गावांना लाभ झाला आहे. एप्रिलच्या उन्हाचे प्रमाण वाढले असल्याने पाण्याची टंचाई अधिक भासू लागली आहे. लोकांसह जनावरांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
याचाच विचार करून आमदार श्रीमंत पाटील यांनी हिप्परगी बॅरेजमधून ऐनापूर उपसा जलसिंचन कालव्यात पाणी सोडण्यासाठी प्रादेशिक आयुक्त व जिल्हाधिकार्यांना फोनद्वारे विनंती केली होती.
त्याची दखल घेऊन प्रशासनाने सोमवारी दुसऱ्यांदा या कालव्यात पाणी सोडले आहे. त्यामुळे दुष्काळात पाण्याविना होरपळणाऱ्या येथील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. या परिसरातील जनतेने आमदारांना मनात मनःपूर्वक सदिच्छा दिल्या आहेत.