कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्यातील 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी दिली.
बेंगलोर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर म्हणाले की, संपूर्ण राज्यात कोरोनाच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी माझी चर्चा झाली असून त्यांनीही या लसीकरणास हिरवा कंदील दाखविला आहे. याबाबत शिक्षण मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
येत्या सोमवारपासून 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सर्व मुलांचे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.