उडूपी येथे संतोष पाटील (वय 35) या कंत्राटदाराने आत्महत्या केल्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. संतोष पाटील यांनी मंत्री के. ईश्वराप्पा यांच्या नावे चिट्ठी लिहून 40 टक्के कमिशन मागितल्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण कर्नाटकात आगडोंब उसळत असताना आता पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवली आहेत. त्यांनी बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरण चौकशीसाठी मलपे (जि. उडपी) येथील पोलीस निरीक्षक शरणगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक तीन दिवसापूर्वी बेळगावात दाखल झाले आहे. या पथकाने आज सोमवारी हिंडलगा ग्रामपंचायतीला भेट देऊन मयत कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्येबाबत चौकशी केली. वर्कऑर्डर नसताना संतोष पाटील यांना तब्बल 4 कोटी रुपये खर्चाची 108 विकास कामे कशी काय करू देण्यात आली? असा प्रश्न यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थित केल्याचे समजते.
कॉलेज रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास असणाऱ्या उडपी येथील तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी काल दिवसभर हिंडलगा परिसरात अनेक लोकांच्या गाठीभेटी घेऊन माहिती जाणून घेतली.
त्याचप्रमाणे मयत कंत्राटदार संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांचा जबाब देखील घेतला. तपासकार्यात उडपी पोलिसांना हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नुर आणि कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी सहकार्य करत आहेत. दरम्यान उडुपीचे तपास पथक बेळगावात ठाण मांडून असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
उडपी येथील एका लॉजमध्ये संतोष पाटील यांनी आत्महत्या केली होती. तत्पूर्वी एका चिठ्ठीत के. ईश्वराप्पा यांनी 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हंटले होते. या प्रकरणाने संपूर्ण कर्नाटक राज्यात एकच खळबळ माजली होती. अशा प्रकारात मोठे मंत्री यांचा समावेश असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले असल्याचे चित्र स्पष्ट होत असतानाच आता उडपी पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी हाती घेतली आहे. हिंडलगा ग्रामपंचायतीच्या पीडीओ व इतर अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेण्यावर भर दिला आहे. मागील चार दिवसांपासून पोलिसांचे पथक हिंडलगा ग्रामपंचायतमध्ये चौकशी करत आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत आहे.
हिंडलगा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात संतोष पाटील यांनी कोणकोणती विकास कामे केली आहेत? याबाबतच्या तपास सुरू करण्यात आला आहे. संतोष पाटील यांनी 4 कोटीची कामे केल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही 4 कोटीची कामे झाली आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. आता या प्रकरणी तातडीने अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर या प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र या साऱ्या प्रकरणात काँग्रेस नेते अग्रेसर झाले असून के. ईश्वरप्पा यांच्या राजीनामा स्वीकारून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आहेत.