श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित ‘श्री चषक -2022’ अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या सामन्यांमध्ये मोहन मोरे इलेव्हन आणि साईराज स्पोर्ट्स या संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळवले.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर आज शनिवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात मोहन मोरे इलेव्हन संघाने प्रतिस्पर्धी अक्षत स्पोर्ट्स संघाला 36 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना मोहन मोरे इलेव्हन संघाने मर्यादित 8 षटकात 9 गडी बाद 106 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल मर्यादित 8 षटकात अक्षत स्पोर्ट्स संघाला 5 गडी गमावून 50 धावा काढता आल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार मोहन मोरे संघाच्या इम्तियाज शेख याने पटकावला. त्याला प्रमुख पाहुणे रमेश गोधनी व नागेश कांबळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
दुसऱ्या सामन्यात शितल रामशेट्टी इलेव्हन संघाने चुरशीच्या लढतीत प्रतिस्पर्धी नियती फाउंडेशन (सरनोबत) संघावर 7 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना शितल राम शेट्टी संघाने मर्यादित 8 षटकात 6 गडी बाद 85 धावा काढल्या प्रत्युत्तरादाखल नियती फाउंडेशनला 8 षटकात 6 बाद 78 धावा करता आल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी शितल रामशेट्टी संघाचा मनोज ताशिलदार ठरला. त्याला प्रमुख पाहुणे शीतल रामशेट्टी आणि विनायक कुंभार यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
तिसऱ्या सामन्यात साईराज स्पोर्ट्स संघाने प्रतिस्पर्धी डिंग डॉंग स्पोर्ट्स संघावर 5 गडी राखून विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना डिंग डॉंग संघाने मर्यादित 8 षटकात 6 बाद 54 धावा काढल्या. प्रत्युत्तरादाखल साईराज स्पोर्ट्स संघाने 4.2 षटकात 5 गडी बाद 57 धावा काढून सामना खिशात टाकला. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्कार साईराजच्या गजानन गुरव याला प्रमुख पाहुणे अनिल बिर्जे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आजचा शेवटचा चौथा सामना मोहन मोरे इलेव्हन आणि शितल रामशेट्टी इलेव्हन या संघांमध्ये खेळला गेला. हा सामना मोहन मोरे इलेव्हन संघाने 10 गडी राखून एकतर्फी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना शितल रामशेट्टी संघाने मर्यादित 8 षटकात 9 गडी बाद 33 धावा काढल्या. हे आव्हान अवघ्या 1.5 षटकात पूर्ण करताना मोहन मोरे इलेव्हन संघाने 35 धावा झळकविल्या. या सामन्यातील ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी मोरे इलेव्हन संघाचा प्रज्योत आंब्रे हा ठरला. त्याला प्रमुख पाहुणे बाबू संगोळ्ळी आणि विजय अचमणी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.