टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथील साई मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजूने बांधण्यात आलेल्या दुकान गाळ्यांचे लवकरच पुरातत्त्व खात्याच्या स्मारकामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे स्मारक करदात्यांचे पैसे कसे पाण्यात घातले जातात आणि आश्वासनांची पूर्तता कशी केली जात नाही, हे जगाला दाखवून देणार आहेत.
बेळगाव शहरात मार्च 2011 मध्ये विश्व कन्नड संमेलनाच्या निमित्ताने शहरातील केळकरबाग, साई मंदिर आदी परिसरातील अनेक दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर बेळगाव महापालिकेने थर्ड स्पेस स्टुडिओ बेळगावने डिझाईन केल्यानुसार नव्याने 48 दुकाने बांधली. सदर दुकाने शहरी शिल्पाकृतीचा नमुना वाटावा म्हणून या दुकान गाळ्यांमध्ये अशी भिंत घालण्यात आली जी दुकानापेक्षा जास्त बाहेर डोकावणारी असेल.
ज्यामुळे दुकान आणि रस्ता यामध्ये ठराविक जागा शिल्लक राहील, असे थर्ड स्पेस स्टुडिओचे प्रवीण बावडेकर सांगितले. साई मंदिर रस्त्यावरील दुकाने 2012 -13 साली बांधून पूर्ण झाली मात्र तेव्हापासून ती वापरात आणलेली नाहीत. त्यानंतर आता 2022 साल सुरू झाले आहे आणि अद्यापही सदर दुकाने विनाकारण धूळखात पडली आहेत.
सदर नव्याने बांधण्यात आलेल्या 48 दुकानांपैकी 35 दुकानांचे वाटप करण्यात आले असले तरी त्यांची कागदपत्रे संबंधित दुकानदारांना देण्यात आलेली नाहीत. परिणामी दुकानं सुरू करणे त्यांच्यासाठी कठीण होऊन बसले आहे. हि दुकाने आगाऊ 50 हजार रुपये आणि 5 वर्षे कोणतेही भाडे नाही, या तत्त्वावर देण्याचा निर्णय 2018 साली घेण्यात आला होता. या दुकानांसंदर्भात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि इतरांचा समावेश असणाऱ्या समितीने यादी करून सरकारकडे पाठवली होती मात्र त्या यादीला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. परिणामी संबंधित दुकाने सध्या वापराविना पडून आहेत. विश्व कन्नड साहित्य संमेलनाप्रसंगी दुकाने पाडतेवेळी पर्यायी जागा देण्याचा विचार करण्यात आला नाही.
परिणामी 35 दुकानदारांनी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन गमावले आहे. साई मंदिर रस्त्यावरील दुकानांचे गाळे त्यांच्या पुनर्वसनासाठी बांधण्यात आले असले तरी अद्यापही ते त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गेली 11 वर्षे हे दुकानदार आपल्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असून बांधण्यात आलेली दुकाने नेमकी आहेत तरी कोणासाठी? असा प्रश्न आता त्यांना पडू लागला आहे.