नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील बेळगावसह 15 रेल्वेस्थानकांवर ‘एक स्टेशन एक उत्पादन’ हा आगळा उपक्रम राबविला जाणार असून या उपक्रमांतर्गत स्थानिकांना स्वतःची उत्पादने विकता येणार आहेत. यासाठी स्थानिक कारागीर विणकर शेतकरी आदींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
नैऋत्य रेल्वेच्या ‘एक स्टेशन एक उत्पादन’ उपक्रमांतर्गत प्रवाशांना तात्पुरत्या स्टॉलवरून वस्तू सहज उपलब्ध होतील. उत्पादने स्टेशनवर आणि प्लॅटफॉर्मवर देखील विकता येतील.
एका स्थानकावर फक्त एका स्टॉलला परवानगी असेल. एका स्थानकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ते सोडत काढून वाटप केले जातील. उत्पादने स्वदेशी असली पाहिजे. त्यामध्ये स्थानिक /स्वदेशी भाजीपाला, फळे पिकवणारे शेतकरीही अर्ज करू शकतात.
रेल्वेस्थानकावर त्यांना विक्री आउटलेटच्या तरतुदीद्वारे कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. हुबळी, धारवाड, बेळगाव, विजापूर, बागलकोट,
गदग, कोप्पळ, होस्पेट, गंगावती, बळ्ळारी इत्यादी रेल्वे स्थानकांवर प्रदर्शनासह विक्री काऊंटर प्रदर्शित करण्यास स्वारस्य असलेल्यांनी रविवार दि. 24 एप्रिल पूर्वी 9731668954 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.