सार्वजनिक वाचनालय, बेळगावच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन रविवार दि. १७ एप्रिल रोजी झाले. गोवा येथील साईश देशपांडे यांनी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. व्याख्यानाच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकार पुरस्कार वितरण सोहळाही आयोजित करण्यात आला होता.
सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अध्यक्ष नेताजी जाधव, कार्यवाह रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह लता पाटील आदी यांना मानचिन्ह, रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थीनींचाही सत्कार करण्यात आला. एमए मराठी विभागात राणी चन्नम्मा विद्यापीठातील तेजस्विनी कांबळे आणि बीए मराठी विभागातील आरपीडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली बिर्जे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गोवा येथील डॉ. साईश देशपांडे यांनी गुंफले.
गोव्यातील निवडक प्रयोगात्मक कला या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले.. गोव्यातील लोककला स्वरूप आणि आविष्कार या विषयावर विचार मांडले. यावेळी बोलताना डॉ. देशपांडे म्हणाले, लोकनाट्याचे सर्व प्रकार महत्वाचे आहेत. लोककलेतून केवळ स्वतःचा विचार करून कोणतीही कला मांडली जात नाही. गावच्या भाल्याच्या आपलेही भले आहे, याच दृष्टिकोनातून लोककलेतून मुद्दा मांडला जातो. लोकनृत्य हि लोककलेतील महत्वाची कला आहे.
व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात, सोमवार दि. १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता झी मराठी फेम अजितकुमार कोष्टी यांचा हसवणूक हा कार्यक्रम होणार आहे. सीमाभागातील अनेक ग्रामीण मराठी साहित्यात त्यांनी आपली कला सादर केली आहे.
रविवारी झालेल्या कार्यक्रमात सार्वजनिक वाचनालयाचे संचालक, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.