राज्यात पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या अर्थात बारावीच्या परीक्षेला आज शुक्रवारी 22 एप्रिलपासून प्रारंभ झाला असून परीक्षा सुरळीत होण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याने तयारी पूर्ण केली आहे. हिजाब घालून येणाऱ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नसल्याचेही पदवीपूर्व खात्याने स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारने दहावी प्रमाणे या परीक्षेप्रसंगी देखील विद्यार्थ्यांसाठी गणवेश सक्तीचा केला असून हिजाबवर बंदी असणार आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रापासून 200 मी. अंतरापर्यंत 144 कलमान्वये जमावबंदी असणार आहे. परीक्षा केंद्र आवारात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त परीक्षा केंद्र आणि आवारात सीसीटीव्ही कॅमेराची नजर असणार आहे.
काल गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत परीक्षार्थींची आसन क्रमांक घालण्याचे काम सुरू होते. बारावीची ही परीक्षा 22 ते 28 मे या कालावधीत होणार असून सर्व पेपर सकाळी 10:15 ते दुपारी 1:30 यावेळेत घेतले जाणार आहेत. आज पहिल्या दिवशी बिझनेस स्टडीज व तर्कशास्त्र हे दोन पेपर होणार आहेत.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 41 केंद्रांमध्ये परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखातून 24 हजार 46 परीक्षार्थी तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 27 हजार 807 परीक्षार्थी या परीक्षेला बसले आहेत.
दरम्यान, राज्यभरात या परीक्षेसाठी 7 लाख 84 हजार 255 विद्यार्थी-विद्यार्थिनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी राज्यभरात 1076 केंद्रे स्थापण्यात आली आहेत. परीक्षेला 6 लाख 519 नियमित विद्यार्थी, तर 61 हजार 808 रिपीटर्स विद्यार्थी बसणार आहेत. याशिवाय 21 हजार 928 बहिस्त विद्यार्थ्यांनी देखील नोंदणी केली आहे.