Tuesday, May 21, 2024

/

पीयुसी सेकंड परीक्षेसाठी हिजाबवर बंदी : मंत्री नागेश

 belgaum

पदवीपूर्व द्वितीय वर्षाच्या (पीयुसी सेकंड) होणाऱ्या परीक्षेसाठी हिजाब परिधान करून येण्यास बंदी आहे. परीक्षार्थींनी सर्वसामान्य पोशाख अथवा गणवेशात परीक्षा केंद्रात उपस्थित रहावे. हिजाबसह अन्य कोणतेही धार्मिक वस्त्र परिधान करण्यावर बंदी आहे. परीक्षेसाठी सर्वसामान्य पोशाख अथवा गणवेश सक्तीचा असेल, असे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात येत्या 22 एप्रिल ते 18 मे या कालावधीमध्ये 2021 -22 सालची पदवीपूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री आज मंगळवारी बेंगलोर येथे विधान सौध येथे पत्रकारांशी बोलत होते. हिजाब परिधान करून येणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षेला बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. पदवीपूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा देण्यासाठी एक सारखा पोशाख सक्तीचा असेल.

एसएसएलसी परीक्षेप्रमाणे पदवीपूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थींना सर्वसामान्य पोशाख अथवा गणवेशातच यावे लागेल. हिजाब तथा तत्सम अन्य धार्मिक अथवा धर्म सुचक पोशाख परिधान करून परीक्षेला बसण्यास परवानगी दिली जाणार नाही. परीक्षेला बसू न शकणार्‍यांसाठी दरवर्षीप्रमाणे पूरक परीक्षेची सोय असणार आहे, असे शिक्षण मंत्री नागेश यांनी सांगितले.

 belgaum

पदवीपूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा येत्या 22 एप्रिल ते 18 मे या कालावधीमध्ये सकाळी 10:15 ते दुपारी 1:30 या वेळेत घेतली जाईल. सदर परीक्षेसाठी एकूण 6 लाख 84 हजार 255 परीक्षार्थींची नांव नोंदणी झाली आहे. यामध्ये 3 लाख 46 हजार 936 विद्यार्थिनी आणि 3 लाख 37 हजार 319 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील 1076 परीक्षा केंद्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यांमधील कला शाखेचे 2 लाख 28 हजार 167, वाणिज्य शाखेचे 2 लाख 45 हजार 519 आणि विज्ञान शाखेचे 2 लाख 10 हजार 569 विद्यार्थी विद्यार्थिनी ही पदवीपूर्व द्वितीय वर्षाची परीक्षा देतील. परीक्षेसाठी एकुण 5241 महाविद्यालयांमधून विद्यार्थी-विद्यार्थिनींची नोंदणी झाली आहे.

परीक्षा काळात कडक पोलीस बंदोबस्ताबरोबरच परीक्षा केंद्र परिसरात 144 कलमान्वये जमावबंदीचा आदेश जारी असणार आहे. परीक्षार्थींसाठी बसेसची सोय केली जाणार असून हॉल तिकीट दाखवून परीक्षार्थी या सेवेचा लाभ घेऊ शकतात, अशी माहितीही शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.