बेळगावचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी सकाळी भारत सरकारच्या पर्यटन आणि बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन बेळगाव परिसरातील मंदिरांचा विकास आणि जीर्णोद्धारासाठी पर्यटन खात्याकडून 500 लाख (5 कोटी) रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती केली.
बेळगाव परिसरातील 4 महत्त्वाची धार्मिक स्मारकं आणि 12 व्या शतकातील भगवान श्री बसवेश्वर अनुभव मंडप प्रतिकृतीची स्थापना करण्यासाठी 500 लाखांचा निधी उपलब्ध करण्याची विनंती आमदार ॲड. बेनके यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे.
आमदारांनी नमूद केलेल्या चार स्मारकामध्ये (मंदिरं) श्री सिद्धेश्वर मंदिर कणबर्गी, श्री ज्योतिबा मंदिर शिवबसवनगर, मठ गल्ली आणि बसवान गल्ली येथील चिक्क बस्ती व दोड्ड बस्ती तसेच महांतेशनगर येथील अनुभव मंडपाचा समावेश आहे.
नवी दिल्ली येथील भेटीप्रसंगी झालेल्या चर्चेत मंत्री श्रीपाद नाईक यांनी आवश्यक निधी जरूर मंजूर केला जाईल असे होकारार्थी आणि खात्रीशीर आश्वासन आपल्याला दिले आहे. यासाठी मी वैयक्तिकरित्या त्यांचे आज आभार मानले आहेत, असे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सांगितले.