बेळगाव विमानतळ येथे आज शुक्रवारी पार पडलेल्या विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत सुरु असलेल्या विमानसेवा, विकास कामे आदींचा आढावा घेण्यात आला.
बेळगाव विमानतळाच्या कार्यालयामध्ये आज शुक्रवारी सकाळी खासदार मंगला अंगडी यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ सल्लागार समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत भारतीय विमानतळ प्राधिकरणाला पाठविण्यात येणारे प्रस्ताव, सुरू असलेल्या विविध विमानसेवा, विमानतळाच्या ठिकाणी हाती घेण्यात आलेली विकास कामे आदींबाबत चर्चा करून आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे भावी उपक्रम व योजनांबाबत चर्चा करण्यात आली.
बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी लवकरच दोन वैमानिक प्रशिक्षण संस्था सुरू केल्या जाणार आहेत त्याबाबत, तसेच विमानतळापासून रेल्वे स्थानक आणि बस स्थानकापर्यंत विशेष बससेवा सुरु करण्याबाबतही आजच्या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.
बैठकीस जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य, पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, सल्लागार समितीचे सदस्य संजय भंडारी, देयण्णावर, गुरुदेव पाटील, प्रियांका आजरेकर, अनुप काटे, ज्योती शेट्टी आदी उपस्थित होते.