काकती तायक्वांदो स्पोर्ट्स अकादमी म्हणून 2012 मध्ये तायक्वांदो मास्टर श्रीपाद रवी राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या राव युवा अकादमीला सर्व क्रियाकलापांच्या व्याप्तीसाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फाॅर स्टॅंडरडाईजेशनच्या नियमानुसार आयएसओ 9001:2015 प्रमाणपत्र मिळावे आहे.
काकती तायक्वांदो स्पोर्ट्स अकादमी म्हणून 2012 मध्ये स्थापन झालेल्या राव युवा अकादमीने तायक्वांदो मास्टर श्रीपाद रवी राव यांच्या प्रशिक्षणाखाली अनेक जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील तायक्वांदो खेळाडू तयार केले आहेत. केवळ बेळगाव जिल्ह्यातच नव्हे तर उडुपी आणि विजयपुरा जिल्ह्यातही ही अकादमी यशस्वीपणे तायकवांडो प्रशिक्षण देत आहे. तायक्वांदो प्रशिक्षणाखेरीज सदर अकादमी ललित कला, संस्कृती, साहस, योगा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण असे अनेक उपक्रम राबवत आहे.
सध्या अकादमीच्या क्रियाकलापांची व्यवस्थापन गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने ही अकादमी एसएआय, एनएसएनआयएसने निर्धारित केलेल्या क्रीडा शास्त्रानुसार तायक्वांदो प्रशिक्षण, स्वसंरक्षण प्रशिक्षण, शारीरिक तंदुरुस्ती प्रशिक्षण, क्रीडा कार्यक्रम व्यवस्थापन, जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा,
सांस्कृतिक, शैक्षणिक व युवा उपक्रमांचे आयोजन, क्रीडा संघ व क्रीडा संघटना यांना प्रशासकीय सहाय्य प्रदान करणे, साहसी उपक्रम आयोजित करणे आणि व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देणे या सर्व क्रियाकलापांसाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फाॅर स्टॅंडरडाईजेशनच्या नियमानुसार आयएसओ 9001:2015 प्रमाणिकृत झाली आहे. या पद्धतीने मानकांचे पालन करणारी जिल्ह्यातील ही पहिली तायक्वांदो प्रशिक्षण संस्था आहे.
याबद्दल बेळगाव जिल्हा तायक्वांडो संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रभाकर दिलीपकुमार शेडबाळे आणि सचिव महादेव मुत्नाळे यांनी मास्टर श्रीपाद रवी राव, सहाय्यक प्रशिक्षक स्वप्नील राजाराम पाटील व वैभव राजेश पाटील यांचे अभिनंदन करून हर्ष व्यक्त केला. अकादमीला सुरुवातीपासून दिवंगत मनोहर मुंगारी यांचे आशीर्वाद तसेच काकती श्री सिद्धेश्वर देवस्थान व्यवस्थापन समितीचे सतत प्रोत्साहन लाभत आहे.