बेळगावात आयटी पार्क प्रकल्प निर्मितीसाठी भू-संपादनाच्या हालचाली वाढल्या असून या संदर्भात केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील खासदारांनी नुकतीच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
बेळगावातील आयटी पार्क निर्मितीचा प्रस्ताव मध्यंतरी मागे पडला होता. मात्र आता पुन्हा त्याला चालना मिळाली असून भू-संपादनाच्या हालचाली वाढल्या आहेत.
तुर्कमट्टी येथील जागा आयटी पार्कसाठी घेण्याची तयारी झाली आहे. मात्र ही जागा संरक्षण खात्याची असल्यामुळे संरक्षण खात्याला याबाबत अहवाल देऊन जागा राज्य शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे.
यासंदर्भात यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन जमीन हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र या कामाला अधिक गती मिळावी या उद्देशाने केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार अण्णासाहेब जोल्ले व खासदार इरण्णा कडाडी उपस्थित होते.
तुर्कमट्टी येथे आयटी पार्क उभारण्याचा प्रस्ताव असून याबाबत लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात यावी. या विषयावर एकत्रित निर्णय घेण्यासाठी ही बैठक घेतल्यामुळे सदर विषयाला गती मिळण्यासह भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल, असा अभिप्राय खासदारांनी मांडला आहे. एकंदर बेळगावात आयटी पार्क उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी जोरदार पाठपुरावा चालविला आहे.