पुनर्निर्मित बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने व्यक्त होणाऱ्या तीव्र संतापाची दखल घेत उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर श्री छ. शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा उभाराव्यात, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवे यांच्याकडे केली आहे.
बेळगावचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी नवी दिल्ली मुक्कामी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. तसेच बेळगाव रेल्वे स्थानकावर शाहू महाराज छत्रपती व छ. शिवाजी महाराज या दोघा महापुरुषांची प्रतिमा बसविण्याच्या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले.
पुनर्निर्मित नव्या बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील भिंतीवर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, संगोळी रायण्णा, कित्तूर राणी चन्नम्मा अशा महापुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. तथापि दुर्देव आणि खेदाची बाब म्हणजे यामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी महाराजांचीच प्रतिमा नाही.
या प्रकारामुळे शिवभक्तांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे. शिवरायांच्या प्रतिमेसाठी अनेकांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
याची दखल घेत आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज थेट रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतीकारांचा प्रतिमांमध्ये छ. शिवाजी महाराज तसेच राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमांना स्थान दिले जावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, हिंदुत्वाचे पाठीराखे म्हणविणाऱ्या केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाला आमदार बेनके यांच्या मागणीनंतर तरी जाग येणार आहे काय ? असा संतप्त सवाल केला जात आहे.