बेळगाव शहरातील दुसरे खाजगी भाजी मार्केट बंद करा या मागणीसह शेतकऱ्यांना योग्य हमीभाव द्यावा, आदी मागण्यांसाठी आज सोमवारी शेतकऱ्यांनी रस्त्यावर भाजी टाकून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष सिध्दगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले.
शहरातील खाजगी भाजी मार्केट बंद करून एपीएमसी भाजी मार्केट वाचवावे या मागणीसह शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी योग्य हमीभाव देण्यात साठी एक समिती स्थापन केली जाईल असे आश्वासन दिले होते.
मात्र अद्यापही संबंधित समिती स्थापण्यात आलेली नाही. त्यामुळे सदर समिती तात्काळ स्थापन केली जावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मागण्यांच्या पूर्ततेसाठी केल्या जाणार्या जोरदार घोषणाबाजी बरोबरच सोबत आणलेला भाजीपाला रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांनी छेडलेले हे आंदोलन सार्यांचे लक्ष वेधून घेत होते. सदर आंदोलनात बेळगाव शहर परिसर आणि तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने सहभागी झाले होते.