Saturday, November 16, 2024

/

शेतकऱ्यांनी गोळा केल्या बायपासवरील दारूच्या बाटल्या!

 belgaum

हालगा -मच्छे बायपास रस्त्याच्या ठिकाणी दारूच्या पार्ट्या व अन्य जे गैरप्रकार चालतात त्याला आळा घालण्याच्या मागणीकडे प्रशासन व पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी या बायपास पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येत्या रविवारी सकाळी श्रमदानाने या रस्त्याशेजारील शेतात पडलेल्या दारूच्या बाटल्या व इतर कचरा गोळा केल्या.

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतुन पोलीस संरक्षणात हाती घेण्यात आलेले हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम न्यायालयाच्या आदेशामुळे सध्या ठप्प आहे. याचा गैरफायदा शहर परिसरातील प्रेमीयुगुल जुगारी मंडळी आणि मद्यपींकडून घेतला जात असून सायंकाळनंतर एकांतातील या रस्त्याच्या ठिकाणी जोडीने येऊन अश्लील चाळे करणे, जुगार खेळणे, दारू ढोसणे, सायंकाळनंतर मटन पार्ट्या करणे आदी गैरप्रकार केले जात आहेत. यामुळे बायपास शेजारील शेत जमिनीमध्ये अस्वच्छता पसरण्याबरोबरच दारूच्या बाटल्यांचा खच पडू लागला आहे. सदर गैरप्रकारांना तात्काळ आळा घालण्याची मागणी वेळोवेळी करून देखील प्रशासन अथवा पोलीस खात्याकडून अद्यापपर्यंत कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही.

शेतकऱ्यांनी रयत संघटनेच्या माध्यमातून उग्र आंदोलनाने तसेच न्यायालयाच्या आदेशाने हालगा-मच्छे बायपासचे काम थांबले आहे.पण त्याच बायपासवर तळीराम, जुगारी, गांजा ओढणारे, प्रेमीयुगुलं येऊन रात्री येऊन धिंगाना घालत दारुच्या काचेच्या बाटल्या फोडतात व इतर कचरा तिथेच टाकून जातात. परिणामी शेतकरी व महिला अक्षरशः वैतागून गेल्या आहेत.

मागच्यार्षी यावर आळा घालावा म्हणून ग्रामीण पोलीस ठाण्यात रयत संघटनेतर्फे लेखी निवेदनही देण्यात आले होते. तथापी काहीच कारवाई झाली नसल्याने आतातर बायपासवर येवढ्या बाटल्या, काचा, दारू पार्ट्यांचा कचरा व इतर सामान पडले होते ते गोळा करून एकत्र केले. Farmers

त्याचबरोबर बायपासच्या दोन्ही बाजूला असलेल्या पीकाऊ शेतीत विहिरी आहेत. त्यातील बऱ्याच मोटारी व एक जनरेटरही चोरी गेले आहे. पीकं चोरीला जातात ती वेगळीच. त्यात आता शेतात वाळलेल्या गवताच्या गंज्या आहेत त्यांना दारुडे, जुगारी, पार्ट्या करणारे आग लावतील का? याची भीती शेतकऱ्यांच्या मनात कायमची असते.

ही भिती दूर करण्यात प्रशासन व पोलीस खाते कमी पडत असल्यामुळे आपले संरक्षण आपणच करण्याचे ठरवून बायपास पट्ट्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन येळ्ळूर रोड बायपासवर जमून श्रमदानाने काचेच्या बाटल्या व इतर कचरा गोळा केल्या.

आपण गोळा दिलेल्या कचऱ्याची किमान विल्हेवाट लावण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी. तसेच शेतकऱ्यांच्या श्रमदानाचे गांभीर्य लक्षात घेऊन गैरधंदे करणाऱ्यांना रोखण्यासाठी कठोर पावलं उचलून शेतकऱ्यांना दीलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.