हिंडलगा येथील आत्महत्या केलेले ठेकेदार संतोष पाटील यांच्या कुटुंबियांना कर्नाटक काँग्रेसच्या वतीने अकरा लाखांचे आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा करण्यात आली.
केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी पीडित कुटुंबास कर्नाटक काँग्रेस च्या वतीने 11 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा करत कॉंग्रेस नेते मंडळी वैयक्तिक स्वरूपात मदत करणार असल्याचे सांगितले.
सोमवारी सायंकाळी कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला,के पी सी सी अध्यक्ष डीके शिवकुमार आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या,के पी सी सी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सह काँग्रेसच्या नेत्यांनी त्या ठेकेदाराच्या पीडित कुटुंबाला भेट दिली सांत्वन केले.
मयताच्या कुटुंबाला राज्य सरकारने एक कोटी रुपये नुकसान भरपाई मधून आर्थिक मदत द्यावी याशिवाय ठेकेदाराच्या पत्नीला शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी करत डी के शिवकुमार यांनी नोकरी लागेपर्यंत काँग्रेस पक्षाकडून मयताच्या पत्नीला उद्योग-धंद्यात मदत करण्याचे आश्वासन दिले.
बेळगाव येथील हिंडलगा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये जी चार कोटीची कामे संतोष पाटील यांनी पूर्ण केली त्या कामांचे बिल तात्काळ मंजूर करण्यात यावे त्याची रक्कम त्या कुटुंबाला देण्यात यावी याशिवाय या प्रकरणाला जबाबदार मंत्री के एस ईश्वराप्पा यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी शिवकुमार यांनी केली.
ठेकेदाराच्या आत्महत्त्येला जबाबदार धरून आणि भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत ईश्वराप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली. मंत्र्यांना एक न्याय आणि सामान्य जनतेला एक नये अशी दुजाभावाची वागणूक सरकारने देऊ नये मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना कॉंग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी आरोप केला की हे प्रकरण आत्महत्या नसून स्पष्टपणे खून प्रकरण आहे 40 टक्के कमिशन साठी ठेकेदाराचा छळ करून त्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले आहे हे स्पष्ट झाले आहे. कर्नाटक सरकार आरोपीना वाचवत आहे. भाजपचे सरकार इतके क्रूर आणि मानवता नसलेले सरकार चालवणे कसं काय शक्य आहे प्रश्न करत स्वतःच्या पतीला गमावलेल्या विधवेचे अश्रू भाजपला का दिसत नाहीत असाही प्रश्न केला.