आपल्या पतीचा मृत्यू ही आत्महत्या नसून हा खून ग्रामीण विकास मंत्री के एस ईश्वरप्पा त्यांनी केलेली हत्त्या आहे असा गंभीर आरोप,मृत संतोष पाटील यांची पत्नी जयश्री पाटील यांनी केला आहे.
ईश्वरप्पा यांना आपल्या पतीच्या हत्येप्रकरणी कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. बुधवारी त्या माध्यमांशी बोलत होत्या.डेथ नोट लिहून उडुपी येथील लॉजमध्ये आत्महत्या केलेल्या बेळगावच्या संतोष पाटील यांच्या मृत्यूला मंत्री के ईश्वरप्पा हे जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अवघ्या दोन वर्षांच्या लहान मुलाला घेऊन आता पुढील जीवन कसे काढायचे असा केविलवाणा प्रश्न संतोष पाटील यांची पत्नी उपस्थित केला आहे.यासंदर्भात प्रसारमाध्यमांना आपली केविलवाणी प्रतिक्रिया देताना जयश्री पाटील यांनी सांगितले की, आपल्या पतीकडे मंत्री के ईश्वरप्पा यांनी कमिशन मागितले होते. कामे पूर्ण करण्यासाठी सोन्या चांदीचे दागिने गहाण ठेवून त्यांनी पैसे उभे केले होते.
आत्महत्या करण्यापूर्वी सायंकाळी त्यांनी माझ्या बरोबर चर्चाही केली. नेटवर्क येत नसून सायंकाळी आपण संपर्क साधू असेही आपल्या पतीने सांगितले.
मात्र सकाळी पोलिसांनी फोन केल्यानंतर फोन न उचलल्याने आपल्याला हा संपूर्ण विषय समजला असे त्या म्हणाल्या.दरम्यान संतोष पाटील आत्महत्या प्रकरण चिघळले असून या विषयावर सत्ताधारी भाजपला विरोधी पक्ष धारेवर धरत आहे.