बेळगाव शहरात ‘शेअरिंग बायसिकल’ या नागरिकांना अत्यंत माफक दरात भाड्याने सायकल मिळण्याच्या नव्या सेवेला लवकरच प्रारंभ होणार आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या माध्यमातून ‘याना’ या ॲपच्या सहाय्याने नागरिकांसाठी एका ठिकाणाहून सायकल घेऊन काम आटोपताच ती दुसऱ्या पॉइंटला ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडतर्फे गोवावेस येथील एलआयसी कार्यालयासमोर ‘याना बाईक्स’चे पहिले डॉकिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी 20 डॉकिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. या प्रत्येक स्टेशनमध्ये 10 सायकली उपलब्ध असणार आहेत. निविदेनुसार या सायकलींसाठी प्रति अर्ध्या तासाला 5 रुपये भाडे आकारले जाणार आहे. याना बाईक्स ही कंपनी शहरी भागातील शेअरिंग बाईक्स क्षेत्रात कार्यरत आहे.
बेळगाव स्मार्ट सिटीने या शेअरिंग बाईक्स सेवेसाठी आणि सायकलींसाठी निविदा मागवली होती. तथापि मध्यंतरी कोरोना प्रादुर्भावामुळे ही योजना रखडली होती. अखेर ‘याना बाइक्स’ या कंपनीला बेळगावातील शेअरिंग बाईक्स सेवेचे कंत्राट मिळाले आहे. यामुळे शहरातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी नागरिकांना भाड्याने सायकली उपलब्ध होणार आहेत.
भाड्याने घेतलेली सायकली ज्या ठिकाणी आपले काम होईल तेथील नजीकच्या डॉकिंग स्टेशनमध्ये जमा करावयाची आहे. शेअरिंग बायसिकलमुळे सायकलिंगचा व्यायाम होऊन नागरिकांचे आरोग्यही तंदुरुस्त राहण्यास मदत होणार आहे.
‘याना ॲप’च्या माहितीनुसार बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौक (सिटी बसस्टॉप), आरपीडी कॉर्नर (अजंठा हॉटेलनजीक) टिळकवाडी पहिले रेल्वे गेट, व्हॅक्सिन डेपो, उद्यमबाग (उत्सव हॉटेलनजीक), उद्यमबाग (बेम्को कॉर्नर) जिजामाता चौक, जुना धारवाड रोड, मध्यवर्ती बस स्थानक, कणबर्गी रोड (रुक्मिणी नगर), श्रीनगर गार्डन, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, कृष्णदेवराय सर्कल (कोल्हापूर कत्री), एपीएमसी रोड, हनुमाननगर सर्कल आणि हिंडलगा गणपती येथे डॉकिंग स्टेशन उभारली जाणार आहेत.