बेळगाव शहराच्या उष्म्यात दिवसेंदिवस वाढ होत असून उन्हाळ्याची चाहूल लागू लागल्याने बहुतेक जाणकार मंडळी आपापले कुटुंबीय मित्रमंडळींना भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटीच्या अभियंत्यांना जनतेची नसली तरी प्राण्यांची भरतीच काळजी असल्याचे पहावयास मिळत आहे.
मनुष्याला थंडाव्यासाठी अथवा तहान भागविण्यासाठी एखादी पाण्याची बाटली पुरेशी ठरते. मात्र बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अभियंत्यांनी त्यापलीकडे जाऊन प्राणिमात्राचाही विचार केल्याचे पहावयास मिळत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक मोकाट जनावरे त्याचप्रमाणे पक्ष्यांचे पाण्याविना हाल होतात.
थंडावा न मिळाल्यामुळे उष्माघाताने अथवा स्वच्छ पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे अनेक पशुपक्ष्यांचा मृत्यूही होत असतो. बेळगावच्या शहर नियोजक आणि अभियंत्यांनी ही बाब भलतीच मनावर घेतल्याचे दिसून येत आहे. याचे उदाहरण म्हणजे ग्लोब चित्रपट गृहानजीकचे रस्त्यावर साचलेले पाण्याचे छोटे तळे सदृश्य डबके हे होय.
रस्त्याचे व्यवस्थित बांधकाम करण्यात आले नसल्यामुळे या ठिकाणी रस्त्याकडेला साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात सध्या म्हशी निवांत डुंबताना दिसत आहेत.
येथील रस्ते बांधकामाची कला पाहता वृत्तपत्र माध्यमे, सोशल मीडिया प्राणी पशु पक्षांच्या बाबतीत नुसती बाष्कळ बडबड करत असतात असे वाटू लागले आहे. याउलट रस्त्यावर पाण्याची डबकी निर्माण होईल या पद्धतीने रस्ते बांधून शहर नियोजन आणि अभियंत्यांनी त्यांनाच प्राण्यांची अधिक काळजी आहे हे जणू सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांना सलाम हा केलाच पाहिजे.