Tuesday, September 17, 2024

/

आपल्या देशाकडे ‘विश्वगुरू’ होण्याचे सामर्थ्य : ओम बिर्ला

 belgaum

व्हीटीयुचा 21वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

कोरोना महामारीच्या काळात भारतामध्ये डिजिटल शिक्षणाचे नवे युग सुरू झाले. भारताने अल्पावधीत डिजिटल शिक्षणामध्ये प्रचंड प्रगती करताना जागतिक कीर्ती मिळविली आहे. अपार बौद्धिक संपत्ती असलेल्या आपल्या देशाकडे ‘विश्वगुरू’ होण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

शहरातील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ अर्थात व्ही.टी.यु. चा 21वा वार्षिक दीक्षांत समारंभ आज गुरुवारी सकाळी व्ही.टी.यु.च्या जन संगम येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने लोकसभा अध्यक्ष बिर्ला बोलत होते. जगातील अनेक देशांमध्ये डिजिटल, आयटी -माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास साधण्यामध्ये कर्नाटकातील युवा संशोधक तंत्रज्ञांचा मोठा वाटा आहे. संपूर्ण जगात डिजिटल क्षेत्रामध्ये भारताने साधलेली प्रगती सर्वोत्तम आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात सध्या भारतच आघाडीवर आहे. अपार बौद्धिक संपत्ती असलेला आपला देश सर्व सामर्थ्यानिशी विश्वगुरू होण्याची पात्रता बाळगतो, असे ओम बिर्ला पुढे म्हणाले.

देशाच्या नवनिर्माणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सर एम. विश्वेश्वरय्या त्यांचे नांव असलेल्या व्हीटीयुच्या आजच्या या सोहळ्यात सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे. पदवीपूर्व शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांना ज्ञानदान केलेल्या शिक्षकांसाठी आजचा दिवस जीवनातील अविस्मरणीय असा असणार आहे असे सांगून बिर्ला यांनी शिक्षणातील सर्वोत्तम कामगिरीसह पदक मिळवणाऱ्या आणि रँक संपादन करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे हे लक्षात घ्यावे. त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसह समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या उन्नतीसाठी करावा, असे आवाहनही ओम बिर्ला यांनी केले.

राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आणि राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दीक्षांत समारंभाप्रसंगी व्यासपीठावर उच्च शिक्षण, माहिती -तंत्रज्ञान, जैविक तंत्रज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण, भारत बायोटेक इंट. लि. हैदराबादचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक पद्मभूषण डॉ. कृष्णा इल्ला, बेंगलोरच्या मानद प्रोफेसर पद्मश्री प्रा. रोहिणी एम. गोडबोले, इन्फोसिस बेंगलोरचे सहसंस्थापक व एक्सेलर व्हेंचरचे चेअरमन पद्मभूषण सेनापती क्रिश गोपाळकृष्ण, व्हीटीयुचे उपकुलपती करीसिद्दप्पा, निबंधक प्रा. आनंद देशपांडे, प्रा. रंगास्वामी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या मंत्री अश्वथनारायण यांच्यासह गोपालकृष्ण, इल्ला आणि गोडबोले या मान्यवरांची समयोचित मार्गदर्शनपर भाषणे झाली.

दीक्षांत समारंभामध्ये संशोधनात्मक अध्ययन पूर्ण केलेल्या 515 जणांना पीएचडी, 4 जणांना एमएससी (इंजीनियरिंग) बाय रिसर्च आणि 3 जणांना इंटिग्रेटेड ड्युवेल पदवी प्रदान करण्यात आली. तसेच याप्रसंगी विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयातील एकूण 57 हजार 498 विद्यार्थी-विद्यार्थिनींना बीई /बीटेक पदवी, 902 जणांना बीआर्क. पदवी,12 जणांना बीप्लान पदवी, 4 हजार 362 जणांना एमबीए पदवी, 1387 जणांना एमसीए पदवी, 1292 जणांना एमटेक पदवी, 73 जणांना एमआर्क. पदवी, 33 जणांना पीजी डिप्लोमा, 3 जणांना इंटिग्रेटेड डिप्लोमा डिग्री आणि 4 जणांना एमएससी (इंजीनियरिंग) बाय रिसर्च पदवी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. समारंभास निमंत्रितांसह प्राध्यापकवर्ग, पालक आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.