रायचूरची सिव्हिल इंजीनियरिंगची विद्यार्थिनी बुश्रा मतीन हिने विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यालयामध्ये नवा विक्रम प्रस्थापित करताना सर्वाधिक 16 सुवर्णपदके पटकावून साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या आज पार पडलेल्या 21 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाप्रसंगी 16 सुवर्णपदक मिळविणारी रायचूरची गोल्डन गर्ल बुश्रा मतीन आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाली, सर्वाधिक 16 सुवर्णपदकं मिळविल्याचा एक कन्नडीग म्हणून मला अभिमान आहे. लोकसभा अध्यक्ष, राज्यपाल, मंत्री इतर मान्यवरांनी मला पदवी आणि सुवर्णपदक प्रदान केली ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. माझे वडील रायचूरमध्ये इंजिनीयर म्हणून काम करतात. तेच माझी प्रेरणा आणि मार्गदर्शक आहेत. मी सिव्हिल इंजिनियर शाखा निवडली.
सिव्हिल इंजीनियरिंगमध्ये माझ्या घरातील कोणीही नाही. भविष्यात आयएएस अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न आहे. त्या अनुषंगाने मी यूपीएससी ऑनलाइन शिक्षण -प्रशिक्षण घेऊन तयारी करत आहे, असे सर्वाधिक 16 सुवर्ण पदक मिळवणाऱ्या रायपूरच्या एस.एल.एन. कॉलेजची सिव्हिल इंजीनियरिंग शाखेची विद्यार्थिनी बुश्रा मतीन हिने स्पष्ट केले.
मी आयएएस अधिकारी व्हावे अशी इच्छा असणारे माझे आई -वडिल सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहेत. मी सतत अभ्यास करत नाही. परीक्षेला दोन महिने असताना अभ्यासावर लक्ष केंद्रित करून कठोर परिश्रम घेतल्यामुळे मला रँकसह 7 सुवर्णपदके मिळाली. मी यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. भविष्यात आयएएस अधिकारी बनणे हे माझे स्वप्न आहे अशी प्रतिक्रिया बेळगाव तालुक्यातील हुदली येथील विवेक भद्रकाली याने व्यक्त केली.
विवेकचे वडील नागराज भद्रकाली खानापूर सरकारी शाळेमध्ये शिक्षक आहेत तर आई सविता हुदली गावातील सरकारी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून सेवा बजावत आहे. माझ्या आजच्या यशाला आई -वडील आणि माझे गुरुजन यांचे आशीर्वाद कारणीभूत आहेत. माझा भाऊ देखील इंजीनियरिंग पदवीधर आहे. सुवर्णपदक मिळविण्याचे माझ्या भावाचे स्वप्न मी आज साकार केले, असेही विवेक भद्रकाली याने सांगितले. केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी असणारा विवेक भद्रकाली यंदाच्या दिक्षांत समारंभात बेळगावमधील सर्वाधिक सुवर्णपदक मिळविणारा विद्यार्थी ठरला आहे.